छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याची घटना समोर आली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यातील अनेक भागांत साडेआठशे रुपयांची कापसाची बॅग साडेबाराशेपासून २३०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. ‘एबीपी माझा’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार समोर आला आहे. याबद्दल प्रश्न विचारतात विरोधी पक्षनेते अजित पवार हे संतापल्याचं पाहायला मिळालं.
संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, पाचोड, आडूळ, बिडकीन या गावात स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं आहे. पेरणीच्या तोंडावर कृषी सेवा केंद्र चालकांकडून काही मोजक्या कंपन्यांचे बियाणे वाढीव दरात विकले जात आहेत. सरकारने कापसाच्या बियाणाच्या बॅगेचे दर ८६३ रुपये निश्चित करण्यात आला आहे. असं असताना काही कृषी सेवा केंद्र चालक कापसाची बॅग साडेबाराशेपासून २३०० रुपयांपर्यंत विकत आहेत. याबरोबर अन्य बियाणे घेणं देखील बंधनकारण केलं आहे.
हेही वाचा : ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
याबद्दल मुंबईत प्रसारमाधमाच्या प्रतिनिधीने अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार एकदम संतापले. म्हणाले, “अहो असं कसं तुम्ही बोलता… काहीपण बोलायला लागला तुम्ही… कृषीमंत्र्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप केले आहेत. असं काही होऊ नये म्हणून माणसं पाठवत आहेत. ते माणसं बियाणे वाल्यांना विचारत आहेत, तुमचं बाहेर काढायचं का ठेवायचं सांगा.”
“शेतकऱ्यांना मदत करतो, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. पण, काळबेरे आणि वेगवेगळं ऐकण्यास मिळत आहे. त्याबद्दल माहिती मागवली आहे. काही मंत्र्यांना पायपोस राहिला नाही. मात्र, हे निर्विवाद सत्य आहे. चिपळून आणि कोकणात देखील अव्वाच्या-सव्वा दराने बियाणे विकली जात आहेत,” असं अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा : “मला शिंदे गटाच्या काही खासदारांनी सांगितलं…”, अजित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “गेल्या एक वर्षात…!”
“पाऊस लांबल्याने पेरण्याही लांबल्या आहेत. परंतु, काहींनी आधी पेरण्या केल्या असून, त्या वाया गेल्या आहेत. आता त्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे. दुबार पेरणीची करत असताना बियाणे आणि खताचे दर वाढले आहेत,” असं अजित पवार म्हणाले.