माझ्याबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम सुरू आहे. वास्तविक ज्या बातम्या दाखवल्या जात आहे, त्यात काही तथ्य नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांच्या सह्या घेण्याचं कोणतेही कारण नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार, असं स्पष्टीकरण देत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलं आहे.

“आपण सातत्याने माझ्याबद्दल बातम्या देत आहात, त्यामध्ये यत्किंचित तथ्य नाही,” असेही अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. ते आज ( १८ एप्रिल ) विधिमंडळाबाहेर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा : अजितदादांबाबत नव्या समीकरणांची चर्चा का सुरू आहे?

“आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोक करतात. माझ्या पक्षात माझ्याबाबत आकस असणारं कुणी नाही. काही बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचे असल्यासारखं बोलतात. त्यांना कोणी अधिकार दिला माहिती नाही. पक्षाची बैठक होईल, तेव्हा याबद्दल चर्चा करणार आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं.

हेही वाचा : अजित पवार यांच्याबद्दलचा संभ्रम आता तरी दूर होणार का ?

“तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्याबद्दल सांगा. ज्या पक्षाचं मुखपत्र आहे, त्याबाबत बोला. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडण्यास खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र कोणी घेण्याचं कारण नाही. आमच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ते मग ते राष्ट्रीय किंवा राज्यातील स्तरावर मजबूत आहे,” असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांना खडसावलं आहे.

Story img Loader