मुंबई : महायुती सरकारच्या काळात राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. दुग्धविकास विभागाची साडेआठ हेक्टर जागा अदानीच्या खिशात घातली आहे. मुंबईला लुटणाऱ्या अदानीला राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा, असे आवाहन करत विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुंबईतील अनेक महत्त्वाच्या जागा अदानी कंपनीला दिल्या असल्याचा आरोप केला. कुर्ला येथील दुग्धशाळेची साडे आठ हेक्टर जमीन अदानीला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे १० जून रोजी एकाच दिवशी ही जमीन पशुसंवर्धन विभाग ते महसूल विभाग ते अदानी यांना हस्तांतरित केली गेली. हे हस्तांतर एकाच दिवसात झाले. इतकी तप्तरता कशी अशी विचारणा त्यांनी केली. सुमारे २० हजार कोटी रुपयांची ही जमीन रेडी रेकनरच्या केवळ २५ टक्के दराने दिली गेली आहे. यावरही विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप घेतला. या जमिनीच्या हस्तांतरासंदर्भात तत्कालीन पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांनी आक्षेप घेतल्यामुळेच त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. त्याचप्रमाणे मुंबईतील मिठागरांची तसेच पालिकेच्या जकात नाक्यांची जागा अदानीला दिलेली नाही, असे भाजपचे नेते सांगत होते. त्यांचा दावा आता फोल ठरला असून राज्याचे प्रमुखच अदानीला पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी विरोधकांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत सभात्याग केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition leader vijay wadettiwar criticism that mumbai should be saved from adani amy
First published on: 05-07-2024 at 06:33 IST