गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या विरोधात दररोज नवनवीन प्रकरणे बाहेर येऊ लागली असून, लाच घेताना पकडण्यात आलेला त्यांचा सचिव होता तसेच खासगी सचिवांची नियुक्ती करताना त्यांचा गोपनीय अहवाल दडवून ठेवण्यात आला होता, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला.
गेल्या एप्रिल महिन्यात नोटरीच्या नियुक्तीकरिता ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मिलिंद कदम यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. तेव्हा कदम हे आपले सचिव नाहीत, असा लेखी खुलासा गृहराज्यमंत्री पाटील यांनी केला होता. पण पाटील यांच्या कार्यालयाने २३ फेब्रुवारी लागू केलेल्या आदेशात मिलिंद कदम हे सचिव असून त्यांच्याकडे कोणत्या कामकाजाचे वाटप केले याची माहिती देण्यात आली आहे. ही सारी कागदपत्रे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषेदत सादर केली. खासगी सचिव दीपक कासार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.
एका महिलेने त्यांच्यावर आरोप केले होते. सचिवपदी नेमताना पाच वर्षांंचा गोपनीय अहवाल तपासला जातो. पण कासार यांची नियुक्ती करताना गोपनीय अहवालच दडवून ठेवण्यात आल्याचा आरोप सावंत यांनी केला. गृहराज्यमंत्र्यांचे सचिवच भानगडबाज असल्याने अशा राज्यमंत्र्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवणार, असा सवाल सावंत यांनी केला. मतदारयादीत दुबार नावे, निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्तेची माहिती दडविणे, बेहिशेबी मालमत्ता, सचिवांच्या नियुक्तीत घोळ अशा या रणजित पाटील या राज्यमंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष ठरवतात याचेच आश्चर्य वाटते, असेही सावंत यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा