नयनतारा सहगल निमंत्रण रद्दप्रकरणी विरोधकांकडून मुख्यमंत्री लक्ष्य
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेहरूद्वेष सर्वश्रुत असून मोदींची खप्पामर्जी टाळण्यासाठीच मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून नेहरू परिवाराशी संबंधित असलेल्या नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण महामंडळाने रद्द केले, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. हा निर्णय कुणी घेतला याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनीच करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून या संदर्भातील वाद निर्थक असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधामुळे साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द करण्यात आल्याचा दावा साहित्य महामंडळाने केला असतानाच आता या वादात सर्वच राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरच नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी तो पटणारा नाही. जर तसे नसेल तर राज ठाकरे यांनी मन मोठे करून क्षमा मागितली तसे मुख्यमंत्र्यांनीही मन मोठे करून तसेच नयनतारा सहगल यांची क्षमा मागून त्यांना पुन्हा निमंत्रण दिले पाहिजे. सन्मानाने त्यांना साहित्य संमेलनांमध्ये बोलावून घेऊन त्यांचे भाषण संमेलनामध्ये झाले पाहिजे, अशी मागणीही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. नयनतारा आल्या तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. लोक संमेलन उधळून लावतील, असा दावा आयोजकांनी केला असला तरी मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत आणि एखाद्या साहित्यिकाच्या बोलण्यावर बंदी येत असेल, त्यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्यात येत असेल तर ते योग्य नसल्याचेही मलिक यांनी सांगितले.
‘‘या वादात राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्नसुद्धा हेतुपुरस्सर केला जात आहे. मात्र अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये मुख्यमंत्री अथवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो’’ असा दावाही मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे.
महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा -विखे पाटील
सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. संमेलनाला पुरेशी सुरक्षा देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. सरकारकडून या कर्तव्याची पूर्तता होण्याऐवजी सहगल यांचे निमंत्रणच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला तडा गेला असून, मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भात स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
दुटप्पीपणा सोडा : अशोक चव्हाण</strong>
आपला देश सहिष्णू आहे आणि सहिष्णूच राहील. त्यामुळे साहित्यकांनी समाजाला, आम्हाला विचार आणि दिशा देण्याचे कार्य करीत राहावे, असा मानभावी सल्ला काही वर्षांपूर्वी साहित्यिकांना देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सुरक्षेकरिताच ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करून साहित्य संमेलन बंदी करण्यात आली. या घटनेवरून राज्यातील फडणवीस सरकारचा असहिष्णू चेहरा पुन्हा उघडा पडला आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
सरकारचा दबाव : पाटील
सध्याच्या असहिष्णू वातावरणावर व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवर लेखिका नयनतारा सहगल परखड भाष्य करतील म्हणूनच त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले आहे आणि त्यामागे सरकारचा दबाव आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे.