लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पूर्व उपनगरातील नाहूर गावात महापालिकेच्या भूखंडावर पक्षीगृह (बर्ड पार्क) उभारण्याच्या प्रस्तावाला वन्यजीव तज्ज्ञांनी विरोध केला आहे. येथे पक्षीगृह उभारण्याऐवजी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नाहूर गावातील भूखंडावर पक्षीगृह उभारण्याच्या पालिकेच्या योजनेबाबत ‘रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’ (रॉ) या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी महापालिकेला सूचना आणि हरकती सादर केल्या आहेत. महापालिकेबरोबरच शर्मा यांनी या सूचना आणि हरकतींसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये पक्षीगृहाच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला आहे. त्याऐवजी पक्षी-प्राण्यांबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या, अशी मागणी केली आहे. वन्यजीव बचाव केंद्र, प्राणी जन्म नियंत्रण केंद्र, प्राणी अनाथाश्रम, प्राणी स्मशानगृह ही काळाची गरज असून अशा सुविधांवर भर देणे गरजेचे आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्षीगृहापेक्षा प्राणी आणि पक्ष्यांची काळजी चांगल्या पद्धतीने कशी घेता येईल यावर भर देणे आवश्यक आहे. तस्करी तसेच शिकारीचे प्रमाणही बऱ्यापैकी वाढले आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. याचबरोबर पक्ष्यांसाठी पर्यावरणाचा समतोल कसा साधता येईल याकडे लक्ष द्यायला हवे, असे मत ‘रॉ’चे पवन शर्मा यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा- म्हाडा मुंबई मंडळ सोडत ऑक्टोबर २०२४ : पात्र अर्जदारांची प्रारूप यादीची प्रतीक्षा संपणार… कधी ते वाचा

नाहूर गावात महापालिकेच्या मालकीचे सुमारे १७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन भूखंड असून त्यावर हे पक्षीगृह प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या सल्लागारावर सार्वजनिक सुविधांसह पक्षीगृहाचा आराखडा व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आली होती. सल्लागाराला पक्षीगृहाचे चित्र, तपशीलवार प्रकल्प आरेखन आणि बांधकामादरम्यान देखरेख याबाबत अहवाल तयार करावा लागणार आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळविण्याबरोबरच पक्ष्यांच्या प्रजाती निवडणे आणि सार्वजनिक सुविधांचा आराखडा तयार करणे आदी बाबीदेखील अपेक्षित आहेत.

आणखी वाचा-राज्यात ८० जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू, गेल्या पाच वर्षांत देशभरात ६८७ जण दगावले

उपनगरातील पहिले पक्षीगृह

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि वनस्पती उद्यानात (राणीची बाग) जुना पक्षी विभाग आहे. या विभागात देश-विदेशातील विविध पक्ष्यांचा विहार आहे. नाहूरमधील पक्षीगृह उपनगरातील हे पहिले पक्षीगृह ठरणार आहे. या पक्षीगृहात विविध देशांमधील पक्ष्यांचे स्वतंत्र विभाग असणार आहेत. संबंधित विभागात त्या त्या देशातील पक्षी पाहायला मिळणार आहेत.