मुंबई : साहित्य संमेलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे आता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाला असून महाविकास आघाडीकडून डॉ. गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावल्याने त्यांना उपसभापतीपदावरून दूर करण्यात यावे अशी मागणी या प्रस्तावाद्वारे विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
साहित्य संमेलनातील वादग्रस्त विधानानंतर त्या पुन्हा एकदा शिवसेनेच्या (ठाकरे) निशाण्यावर आल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर तीन दिवसांपासून आजारपणामुळे त्या विधान परिषद सभागृहात उपस्थित राहिलेल्या नाहीत. त्यातच बुधवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधकांच्या वतीने विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला आहे. यावर महाविकास आघाडीतील विधान परिषदेच्या आमदारांकडून सह्या करण्यात आल्या आहेत.
प्रस्ताव आणायला उशीर झाला – उद्धव ठाकरे</strong>
उद्धव ठाकरे यांनी या ठारावावर आपली भूमिका स्पष्ट करताना महाविकास आघाडीने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. हा प्रस्ताव आणायला आमच्याकडून खरा उशीरच झाल्याचे सांगितले. आतापर्यंत त्या निलंबित व्हायला हव्या होत्या. अविश्वासाचा प्रस्ताव आणल्यानंतर त्याच अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित असते. त्यामुळे हा प्रस्ताव ज्या कारणांसाठी आणलाय, ती कारणे समोर येतीलच, पण पक्षांतर हाही एक मुद्दा आहे. यापूर्वीच हा ठराव आणून मंजूर व्हायला हवा होता. , असेही ठाकरे म्हणाले.