लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत २० ते २५ टक्के अधिक आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीची प्रक्रिया असलेल्या अंजायनाला नियंत्रित केल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘दी असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ने (एपीआय) अंजायनाला रोखण्यासाठी ‘ऑप्टा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत हृदयाशी संबंधित त्रास होत असल्याची तक्रारी असलेल्या रुग्णावर अंजायनावरील प्राथमिक उपचार करण्याचे डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

छातीत दुखणे, चालायला त्रास होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, शरीराच्या विविध भागात दुखणे अशा त्रासांकडे नागरिक व डॉक्टर दुर्लक्ष करतात. ही लक्षणे हृदयविकारापूर्वी असलेल्या अंजायनाची असतात. त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याची परिणीती हृदयविकाराच्या झटक्यामध्ये होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित धोके कमी करण्यासाठी आणि रुग्णांना अधिक चांगले आरोग्य मिळावे यासाठी अंजायनाचे लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी ‘एपीआय’ने प्रथमच अंजायना सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ‘ऑप्टिमल ट्रीटमेंट ऑफ अंजायना (ऑप्टा) : द नीड ऑफ दि अवर’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यात आजाराचे वेळीच निदान होण्यासाठीचा कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती एपीआयचे महासचिव डॉ. अगम व्होरा यांनी दिली.

आणखी वाचा-ओडीसातून आलेला गांजाचा मोठा साठा जप्त, एनसीबीच्या कारवाईत चौघांना अटक

अंजायनाची समस्या लवकरात लवकर ओळखून त्यावर उपचार सुरू करणे, हृदयविकार बळावण्याची प्रक्रिया संथ करणे, हृदयविकाराचा धोका कमी करणे तसेच औषधावर होणारा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी ‘ऑप्टा’ हा महत्त्वाचा उपक्रम आहे. ऑप्टा पडताळणी सूची, ऑप्टा प्रश्नावली आणि ऑप्टा दृष्टीकोन अशा तीन प्रक्रिया ‘एपीआय’ने विकसित केल्या आहेत. त्याच्या योग्य अंमलबजावणीने अंजायना व पर्याययाने हृदयविकाराचा झटका रोखणे शक्य होणार असल्याचे एपीआयचे अध्यक्ष डॉ. मिलिंद नाडकर यांनी सांगितले. दुर्लक्षित असणाऱ्या अंजायनाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि देशातील डॉक्टर आणि हृदयविकार तज्ज्ञांच्या माध्यमातून हा उपक्रम अधिक सक्षमपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हृदयविकाराच्या आजारांशी संबंधित मृत्यूंच्या बाबतीत भारत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. दरवर्षी हृदयविकाराने मृत्यू होणाचे प्रमाण पुरुष व स्त्रियांमध्ये अनुक्रमे २०.३ टक्‍के आणि १६.९ टक्‍के इतके आहे. त्यामुळेच अंजायनाकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. भारतीयांमध्ये बरेचदा अंजायनाच्या सर्वसाधारण लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे दिसून येतात. ज्यांच्यामुळे अचूक निदान करण्यामध्ये अडथळे येऊन डॉक्टरांकडून लक्षणांपासून आराम मिळण्यासाठीची औषधे दिली जातात. त्यामुळे हा धोका अधिकच वाढत आहे. हा धोका कमी करण्यासाठी ‘ऑप्टा’ उपक्रमांतर्गत माहिती घेत रुग्णांना सर्वात प्रथम ॲस्पिरीन हे औषध देणे कधीही सोयीस्कर असल्याचे ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. व्ही. टी. शाह यांनी सांगितले.