शासकीय दंत रुग्णालयाच्या आकडेवारीतील निष्कर्ष
तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असाल आणि तोंडामध्ये लाल-पांढरे चट्टे असतील, तोंड उघडताना त्रास होत असेल किंवा तोंडामध्ये जळजळ होत असेल तर सावधान.. ही तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. आश्चर्य म्हणजे तोंडामध्ये कर्करोगाची लक्षणे आढळूनही आणि त्याची जाणीव डॉक्टरांनी करून देऊनही सुमारे ३५ टक्के लोक उपचार घेण्याकडे पाठ फिरवत असल्याचे मुंबईतील शासकीय दंत रुग्णालयाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.
शासकीय दंत रुग्णालयामध्ये दरदिवशी मुंबईतील सुमारे ३५० रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये सुमारे ३५ टक्के रुग्ण तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असल्याचे आढळले आहे. मागील दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार मे २०१६ ते एप्रिल २०१७ या कालावधीमध्ये ८५५ रुग्णांमध्ये तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आढळली. मे २०१७ ते एप्रिल २०१८ या काळात यामध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली असून १४२६ रुग्णांमध्ये तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे तपासणी दरम्यान दिसून आली. मागील दोन वर्षांमध्ये तोंडाच्या कर्करोगाच्या संशयित रुग्णांची संख्या तब्बल २२८१ वर पोहोचली आहे. २०१६ ते २०१८ या दोन वर्षांच्या काळात शासकीय दंत रुग्णालयामध्ये २८४ रुग्णांमध्ये तोंडाचा कर्करोग आढळला असून या रुग्णांना पुढील उपचारासाठी टाटा मेमोरिअल रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे.
तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे उद्भवलेल्या आजारांमध्ये ‘ओरल सबम्युकस फायब्रोसिस’चे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. या आजारामध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे जबडय़ाचे स्नायू ताठरतात. त्यामुळे तोंड उघडण्यास त्रास होतो. सामान्यपणे माणसाचे तोंड हे दोन ते अडीच इंच इतक्या प्रमाणात उघडते. परंतु या रुग्णांना अर्धा किंवा एक इंचापेक्षा जास्त तोंड उघडता येत नाही. २०१६-१७ मध्ये या आजाराचे ३९१ रुग्ण आढळले होते, तर २०१७-१८ मध्ये या रुग्णांची संख्या तब्बल ६४२ वर पोहोचली आहे. तसेच ‘ओरल ल्युकोपाकिया’आजाराच्या या रुग्णांची संख्याही गेल्या वर्षांच्या तुलनेत वाढली आहे. या आजारामध्ये तोंडामध्ये पांढरे चट्टे येतात. २०१६-१७ मध्ये या आजाराचे रुग्णांची संख्या ४६४ होती, तर २०१७-१८ या काळात ती ७८४ वर पोहोचली आहे. हे दोन्ही आजार तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळलेले रुग्ण हे अगदी १५ वर्षांपासून ते ८० वयापर्यंतचे आहेत. यामध्ये तरुण पिढीचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आहेत, असे शासकीय दंत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांनी सांगितले.
रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या तोंडामध्ये तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बोलावले जाते. मात्र बहुतांश वेळा रुग्ण ही गोष्ट गंभीरतेने न घेता पुढील उपचारासाठी येतच नाहीत. मागील दोन वर्षांमध्ये आढळलेल्या तोंडाच्या कर्करोगाचे संशयित रुग्णांपैकी जवळपास ८०० हून अधिक रुग्ण हे उपचारासाठी आलेच नाहीत. काही कालावधीनंतर यापैकी काही रुग्ण हे नंतर जेव्हा उपचारासाठी आले तेव्हा ते कर्करोगाच्या पुढच्या टप्प्यांमध्ये पोहोचलेले होते, असे रुग्णालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सोनाली कदम यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ७० टक्के रुग्ण हे तोंडाच्या कर्करोगाचे असतात. या कर्करोगाचे वेळेत निदान झाले तर नक्कीच पूर्णपणे बरा होतो. मात्र त्यासाठी लक्षणे आढळल्यानंतर तातडीने उपचार घेणे आवश्यक आहे, असेही पुढे डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.