मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे भविष्यात चेंबूर – मरिन ड्राईव्ह आणि नवी मुंबई – मरिन ड्राईव्ह प्रवास थेट आणि अतिवेगवान होणार आहे. मात्र अटल सेतूमार्गे ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह अतिवेगवान प्रवासासाठी वाहनचालक – प्रवाशांना पथकर मोजावा लागणार आहे. मात्र केवळ पूर्वमुक्त मार्गावरून बोगदामार्गे जाणाऱ्या वाहनांना पथकर मोजावा लागणार नाही. पथकर वसुलीसाठी पूर्वमुक्त मार्गावर पथकर नाका उभारल्यास वाहतूक कोंडी होईल. त्यामुळे पूर्वमुक्त मार्गावर पथकर नाका उभारणे अशक्य आहे. परिणामी, केवळ पूर्वमुक्त मार्ग – ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा मार्गे प्रवास करणाऱ्या वाहनांकडून पथकर वसूल करू नये, असे निर्देश नगरविकास विभागाने एमएमआरडीएला दिले आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

एमएमआरडीएच्या १६.८ किमी लांबीच्या पूर्वमूक्त मार्गामुळे चेंबूर – सीएमएसएमटी प्रवास अवघ्या काही मिनिटात करता येत आहे. मात्र सीएसएमटीवरून पुढे मरिन ड्राईव्हला जाण्यासाठी वाहनांना ऑरेंज गेट येथील वाहतूक कोंडीत अडकावे लागते. चेंबूर – मरिन ड्राईव्ह असा थेट अतिवेगवान प्रवास करता यावा यासाठी एमएमआरडीएने ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे ९१५८ कोटी रुपये खर्चाच्या या दुहेरी बोगद्याचे काम एल. ॲण्ड टी.च्या माध्यमातून करण्यात येत आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यास चेंबूर – मरिन ड्राईव्ह प्रवास अतिवेगवान आणि थेट होणार आहे. त्याचवेळी नवी मुंबई – मरिन ड्राईव्ह व्हाया अटल सेतू प्रवासही अतिवेगवान होणार आहे. दरम्यान, या बोगद्याच्या वापरासाठी पथकर आकारणी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यामुळे प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल झाल्यास अतिवेगवान प्रवासासाठी वाहनचालक – प्रवाशांना पथकर मोजावा लागणार आहे. मात्र अटल सेतू मार्गाने येऊन बोगद्याचा वापर करणाऱ्या वाहनांनाच पथकर मोजावा लागणार आहे. मुंबईतील कोणत्याही भागातून पूर्वमूक्त मार्गे येऊन ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह बोगद्याचा वापर करणाऱ्या वाहनांकडून मात्र पथकर वसूल करण्यात येणार नाही. या वाहनांना विनापथकर प्रवास करता येणार आहे.

हे ही वाचा… ‘बेस्ट’अधिकाऱ्यांना फौजदारी समन्स ; दिव्यांग चालकांना पर्यायी काम नाकारल्याबद्दल औद्योगिक न्यायालयाकडून समन्स

पूर्वमूक्तमार्गे आणि अटल सेतूमार्गे येणारी वाहने बोगद्याचा वापर करणार आहेत. दरम्यान, बोगद्याच्या सुरुवातीला पथकर नाका उभारून पथकर वसूल करणे अशक्य आहे. त्यामुळे अटल सेतूमार्गे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांकडून अटल सेतूवरील पथकर नाक्यावरच पथकर वसूल करावा, असे निर्देश नगरविकास विभागाने ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयाद्वारे एमएमआरडीएला दिले आहेत. तर मुंबईतील कोणत्याही परिसरातून पूर्वमूक्तमार्गे येऊन बोगद्याचा वापर करणाऱ्या वाहनांना मात्र पथकर भरावा लागणार नाही. पूर्वमूक्त मार्गावर पथकर नाका उभारत पथकर वसूल करणे शक्य नाही. त्यामुळे या वाहनांकडून पथकर वसुली करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश या शासन निर्णयात देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

हे ही वाचा… वांद्रे रेक्लमेशन येथील भूखंड व्यावसायिक क्षेत्र म्हणून तूर्त विकसित नाही;  राज्य सरकारसह अदानी रियाल्टीची न्यायालयात हमी

अटल सेतूवरील पथकर वसुलीबाबत संभ्रम

अटल सेतूमार्गे येणाऱ्या वाहनांना बोगद्याचा वापर करण्यासाठी पथकर आकारण्यात येईल. हा पथकर अटल सेतूवरील पथकर नाक्यावरच वसूल करण्यात येईल, असे नगरविकास विभागाच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. मात्र, अटल सेतूवरून येणाऱया प्रत्येक वाहनांना हा पथकर भरावा लागणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होण्याची शक्यता आहे. अटल सेतूवरून येणारी वाहने पुढे सीएसएमटीला, वडाळा वा अटल सेतूवरून पुढे पूर्वमूक्तमार्गे मुंबईतील इतर कोणत्याही दिशेने जाऊ शकतात. मग त्यांच्याकडून बोगद्याचा पथकर का वसूल करणार, असा प्रश्न आहे. तर अटल सेतूवरून येणारे कोणते वाहन बोगद्याचा वापर करणार हे कोण आणि कसे ठरवणार. तर बोगद्याचा वापर करून पुढे अटल सेतूवर येणारे वाहन कोणते हे कसे ओळखणार हाही प्रश्न आहे. एकूणच अटल सेतूवर बोगदामार्गे प्रवासासाठीचा पथकर कोणत्या आधारावर आणि कसा वसूल करणार याबाबत शासन निर्णयात स्पष्टता नाही. त्यामुळे पथकर वसुलीसंदर्भात मोठा संभ्रम आहे. महत्त्वाचे म्हणजे या निर्णयाचा फटका भविष्यात अटल सेतूलाही बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.