एमएमआरडीएकडून बांधकामासाठी निविदा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ऑरेंज गेट, पूर्वमुक्त मार्ग ते नरिमन पॉईंट प्रवास केवळ पाच मिनिटांत व्हावा यासाठी हाती घेण्यात आलेला ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंट भुयारी मार्ग-पोहच मार्ग प्रकल्प नव्या वर्षात मार्गी लागणार आहे. या मार्गाचा बृहत आराखडा मंजूर करून अखेर या मार्गाच्या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शनिवारी निविदा मागविल्या आहेत. पुढील तीन-चार महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून जून – जुलैदरम्यान बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : नववर्षाचे स्वागत ‘गुलाबी थंडी’ने, राज्यातील बहुतांश ठिकाणी पारा १० ते १५ अंशावर

पुणे, नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने दक्षिण मुंबईत येणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने  १६.८ किमी लांबीचा पूर्वमुक्त मार्ग बांधला. हा मार्ग २०१३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला असून त्यामुळे चेंबूर ते सीएसटी हे अंतर केवळ २० ते २५ मिनिटांत पार करता येणार आहे. मात्र ऑरेंज गेट येथे आल्यानंतर नरिमन पॉईंटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. त्यावर तोडगा म्हणून एमएमआरडीएने पूर्वमुक्त मार्ग, ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंट असा भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. साडेतीन किमीच्या या प्रकल्पाचा जपानमधील मे. पडॅको कंपनीकडून तयार करून घेतलेला बृहत आराखडा मंजूर झाल्याने आता प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेऊन शनिवारी या भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. निविदा सादर करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील सहा महिन्यात कामास सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ठाण्यात शिंदे गट विरुद्ध भाजप; भाजप आमदारांचा पोलीस ठाण्यात गोंधळ; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

आराखड्यानुसार हा मार्ग ३.५ किमीचा असेल. जाण्यासाठी एक आणि येण्यासाठी एक भुयार मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला ४५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. पण आता मात्र हा खर्च वाढून ६००० कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. अशा या मार्गाच्या कामाला जून-जुलैपासून कामाला सुरुवात करून हा मार्ग २०२५ मध्ये वाहतुकीस खुला करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ऑरेंज गेट, पूर्वमुक्त मार्ग ते नरिमन पॉईंट प्रवास केवळ पाच मिनिटात होणार आहे. त्याचवेळी चेंबूर ते नरीमन पॉईंट अंतर पूर्वमुक्त मार्ग आणि भुयारी मार्गाद्वारे केवळ ३० ते ३५ मिनिटांत पार होणार आहे. पुढे हा मार्ग नरिमन पॉईंटवरून मुंबई महानगरपालिकेच्या सागरी किनारा मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरात पोहोचणे वाहनचालकांसाठी सोपे होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Orange gate to nariman point subway work to start in new year mumbai print news ysh
Show comments