जिद्द, उत्साह आणि जिंकण्याची ईर्षां गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’ आयोजित ‘वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात पाहायला मिळाली होती. स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे बिगुल वाजले असून नव्या वर्षांत प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात होणार आहे. राज्यभरातील महाविद्यालयांमधून ‘वक्ता दशसहस्रेषु’चा लौकिक जिंकण्यासाठी वाग्युद्धाला सुरुवात होणार आहे.
राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून उत्तम वक्ते देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १८ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. समाजात घडणाऱ्या घटनांवर तरुणाईच्या मनाची स्पंदने टिपणाऱ्या या स्पर्धेसाठी केवळ हुशारी उपयोगी ठरणार नाही तर हजरजबाबीपणा, एखाद्या घटनेचा चौफेर विचार करून नवे काही मांडण्याची तयारी अशा गुणांचा कस लागणार आहे. ही स्पर्धा राज्यभरातील आठ प्रमुख शहरांमधील महाविद्यालयांमधून घेण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नागपूर आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडणार आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १८ जानेवारीपासून पुणे आणि औरंगाबाद येथून सुरुवात होणार आहे. त्यापाठोपाठ १९ जानेवारीला नाशिक, २१ जानेवारीला नागपूर, ठाणे आणि नगर येथे २३ जानेवारीला, तर मुंबई आणि रत्नागिरीत २४ जानेवारीला प्राथमिक फेरी होईल. विभागीय प्राथमिक फेरीतून निवडलेले स्पर्धक विभागीय अंतिम फे रीत दाखल होतील आणि अंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करून पुढे येणाऱ्या प्रत्येक केंद्रातील एकेक विद्यार्थी असे आठ विद्यार्थी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फे रीत ‘वक्ता दशसहस्रेषु’साठी स्पर्धा करतील.
‘वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेसाठीचे विषय हे अधिक आव्हानात्मक आणि विचार करायला लावणारे असतात. पहिल्या पर्वातील स्पर्धकांनी या विषयांना न्याय देण्याचा आपापल्या परीने चांगला प्रयत्न केला. आता दुसऱ्या पर्वात हे विषय अधिक रंगतदार असतील का? याचे उत्तरही नवीन वर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात स्पर्धकांना मिळणार आहे. ‘वक्ता दशसहस्रेषु’च्या प्राथमिक
फे रीसाठी निश्चित झालेले विषय रविवार, ३ जानेवारीला ‘लोकसत्ता’तून प्रसिद्ध होतील. स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्जही ‘लोकसत्ता’च्या https://loksatta.com/vaktrutvaspardha/entryform/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. स्पर्धेचे अधिक तपशील https://loksatta.com/vaktrutva-spardha या संकेतस्थळावर पाहता येतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा