गृहवित्त कंपनीकडून घेतलेले कर्ज विहीत मुदतीत फेडू न शकलेल्या ‘ऑर्बिट कॉर्पोरेशन’च्या मुंबईतील तीन मालमत्तांवर टाच आली आहे. ९६ कोटींच्या थकीत कर्जासाठी ‘ऑर्बिट’च्या तीन मालमत्ता ताब्यात घेण्याची मुभा ‘एलआयसी हाऊसिंग फायनान्स’ला बुधवारीच मिळाली.
अंधेरी, लोअर परळ आणि लालबागसारख्या मोक्याच्या ठिकाणांच्या निवासी जागांचा यात समावेश आहे. पैकी एका जागेचा ताबा यापूर्वीच घेण्यात आला
आहे.
अंधेरी, पूर्वेतील एक लाख ७० हजार चौरस फुटांवर पसरलेल्या ‘ऑर्बिट रेसिडन्सी पार्क’च्या जागेचा ताबा घेतला आहे, असे ‘एलआयसी हाऊसिंग फायनान्स’ने या नोटिशीत म्हटले आहे. ‘एलआयसी हाऊसिंग फायनान्स’ने ३२५ कोटी रुपयांचे कर्ज भाडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या ‘ऑर्बिट कॉर्पोरेशन’ला दिले होते. त्यापोटी अंधेरीबरोबरच लालबाग येथील ‘ऑर्बिट मिडटाऊन’ची ४५ हजार ६०० चौरस फूट, लोअर परळ येथील ऑर्बिट ग्रँडची २६ हजार चौरस फुटांची जागा तारण ठेवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष २६० कोटींचे कर्ज घेण्यात आले. ‘ऑर्बिट’ने यापैकी १६४ कोटी रुपयांचे कर्ज २०१० अखेपर्यंत फेडले. ९६ कोटी रुपयांचे देणे थकले होते.
विविध परवानग्यांअभावी बांधकाम रखडल्याने प्रकल्प अपूर्ण राहिले. परिणामी त्यातून येणारे पैसेही अडकले. या थकीत कर्जापोटी ‘एलआयसी हाऊसिंग फायनान्स’ने मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे दावा दाखल केला. त्यांनी नुकतीच मालमत्ता ताब्यात घेण्याबाबतचा आदेश दिला.
मागणी-पुरवठा आणि विक्रीअभावी शहरातील मोठय़ा मालमत्तांच्या व्यवहारांना खो बसला आहे. त्यातूनच ही घटना घडल्याचे मालमत्ता क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा