मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा न स्वीकारण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय मनमानी असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने गुरुवारी ओढले. लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारा आणि तसे पत्र त्यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिले.
‘‘राजीनामा स्वीकारण्याचे विशेषाधिकार महापालिकेला किंवा आयुक्तांना आहेत. लटके या महापालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यामुळे महापालिकेने त्यांना मदत करायला हवी, असे सुनावताना एखाद्या कर्मचाऱ्याला राजीनामा देऊन निवडणूक लढवायची असेल तर त्यात अडचण काय आहे?’’ असा प्रश्न न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने केला. तसेच महानगरपालिका आयुक्त विवेकाचा वापर न करता निर्णय घेत असल्याचेही न्यायालयाने सुनावले.
अशी प्रकरणे न्यायालयापर्यंत का येतात?
पालिका राजीनामा स्वीकारत नसल्याने तो स्वीकारण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. आम्हाला एकूण परिस्थितीचा विचार करावा लागतो. आमच्यासमोरील प्रकरण हे पालिकेतील एका कर्मचाऱ्याच्या राजीनाम्याचे आहे. या कर्मचाऱ्याचा राजीनामा स्वीकारणार की नाही, एवढेच महानगरपालिकेला सांगायचे होते. या प्रकरणाला जास्त महत्त्व देऊ नका. अशी प्रकरणे न्यायालयापर्यंत आणून न्यायालयाचा ताण आणखी वाढवू नका. आमच्यासमोरील वाद हा केवळ सेवेशी संबंधित आहे. न्यायालयात येण्यासारखे हे प्रकरण नाही. महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत आतापर्यंत निर्णय घ्यायला हवा होता, अशा शब्दांत न्यायालयाने महापालिकेच्या या प्रकरणातील भूमिकेवर ताशेरे ओढले.
लटके यांच्याविरोधात तक्रार, पालिकेचा दावा
लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यात अडचण काय, असा प्रश्न न्यायालयाने महानगरपालिकेचे वकील अनिल साखरे यांना विचारला. तसेच महानगरपालिका लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यास तयार आहे की नाही, हे स्पष्ट करण्यास सांगितले. दुपारच्या सत्रात प्रकरण सुनावणीसाठी आले त्यावेळी मात्र लटके यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपाची तक्रार आल्याचे आणि त्यांच्या राजीनाम्याबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य नाही. तक्रारीची चौकशी करूनच निर्णय घेणे शक्य आहे, असे साखरे यांनी न्यायालयाला सांगितले. परंतु ही तक्रार १२ ऑक्टोबर रोजी आली, याकडे लक्ष वेधून लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
राजकीय दबावाचा लटके यांचा आरोप
लटके यांच्याविरोधात बुधवारी करण्यात आलेल्या तक्रारीच्या सत्यतेवर त्यांचे वकील विश्वजीत सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यात महानगरपालिका विलंब करत असल्याचा आरोप केला. महानगरपालिकेने राजकीय बाजू घेणे अपेक्षित नाही. परंतु, महानगरपालिकेकडून तेच केले जात आहे. लटके या एक कर्मचारी असून त्यांच्या नावे कोणती थकबाकी आणि चौकशी प्रलंबित नाही. साधारण स्थितीत सहआयुक्तांनीच राजीनामा स्वीकारला असता. मात्र, राजकीय परिस्थितीमुळे लटके यांचा राजीनामा आयुक्तांसमोर प्रलंबित असल्याचा आरोप सावंत यांनी केला.
आज अर्ज भरणार; प्रतिस्पर्धी कोण?
मुंबई : न्यायालयाच्या निर्णयामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार म्हणून शुक्रवारी सकाळी त्या अर्ज दाखल करणार आहेत. या जागेवर भाजप की, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ लढणार, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोघांपैकी कोण लढणार, यासंदर्भात संभ्रम कायम असला तरी मुरजी पटेलच लढण्याची चिन्हे आहेत.