मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामे शोधण्याचे काम सहाय्यक अभियंत्यांवर सोपविले असून अशी बांधकामे आढळून आल्यास संबंधित सहाय्यक अभियंता शिक्षेस पात्र ठरणार आहे. याबाबत फेरविचार न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा अभियंत्यांच्या संघटनांनी दिला आहे.
राज्य सरकारने महापालिका कायद्यात केलेल्या बदलांमुळे अनधिकृत बांधकामांवर पांघरुण घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांची जबाबदारी विभाग कार्यालयांतील सहाय्यक अभियंत्यावर सोपविण्याचा घाट घातला आहे.
 त्यामुळे सहाय्यक अभियंत्यांचे खच्चीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सहाय्यक अभियंत्यांवर अनधिकृत बांधकामांची जबाबदारी टाकू नये अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने दिला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये अनधिकृत बांधकामे तोडणाऱ्या अभियंत्यांवर नागरिकांकडून हल्ले होत आहेत. मात्र अभियंत्यांना संरक्षण देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.