लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मराठी रंगभूमीची मातृसंस्था असलेल्या अ. भा. मराठी नाट्य परिषदेने आपल्या प्रचलित चाकोरीबाहेर जाऊन देशातील विविध भाषिक नाटकांचा महोत्सव आयोजित करणे हे फार मोठे पाऊल आहे. आजवर आपण आपल्या यशाच्या कैफात मग्न होतो. त्यापलीकडे जाऊन आपण आपली बलस्थाने आणि कमतरता आजमावून पाहण्याची गरज होती. त्याची ही सुरुवात आहे, असे उद्गार दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी काढले. अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या मुंबई विभागीय टप्प्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

केरळसारखे छोटे राज्य दरवर्षी आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव आयोजित करते. जगभरात नाट्यक्षेत्रात काय चालू आहे हे आपल्याकडच्या रंगकर्मींना आणि नाट्यरसिकांना दाखवणे हा त्याचा उद्देश असतो. आपल्याकडेही निरनिराळ्या संस्था असे नाट्यमहोत्सव आयोजित करत असतात, पण अ. भा. मराठी नाट्य परिषदेने असा नाट्यमहोत्सव आयोजित करण्याला एक महत्त्व आहे. या पुढच्या काळात असे आदानप्रदान सुरू राहील आणि आपण राष्ट्रीय स्तरावर नेमके कुठे आहोत याचा तुलनात्मक आढावा घेता येईल, असे केंद्रे म्हणाले.

मराठी नाटकामुळे आम्हा कलाकारांना ओळखले जाते आणि त्यामुळेच आदराने वागवले जाते. तेंडुलकर, आळेकर, एलकुंचवार ही नावे बहुतेकांच्या कानावरून गेलेली असतात. त्यांच्यामुळेच आजच्या पिढीला मराठी नाटकाची ओळख होते. या दिग्गजांच्या कार्यकर्तृत्वामुळेच मराठी नाटकाला, इथल्या कलावंतांना ओळख मिळाली आहे, असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मुंबई विभागीय नाट्यसंमेलनाचे उद्घाटन वामन केंद्रे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष डाॅ. मोहन आगाशे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे, शशी प्रभू आदी उपस्थित होते.

या बहुभाषिक नाट्यसंमेलनाचे संकल्पक आणि शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल मात्र या सोहळ्यास उपस्थित नव्हते.

Story img Loader