संयुक्त महाराष्ट्र लढय़ात फ्लोरा फाउंटन येथे १४ जण हुतात्मे झाले आणि या लढय़ाचा वणवा सर्वत्र पेटला. लढय़ानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि फ्लोरा फाउंटनचे नामकरण ‘हुतात्मा चौक’ करण्यात आले. आता या नावात ‘हुतात्मा स्मारक चौक’ अशी दुरुस्ती करण्याची मागणी होऊ लागली असतानाच मूळ नामकरणाच्या प्रस्तावाचे कागदपत्र पालिकेतून गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. कागदपत्रे नसल्याने या चौकाच्या नामविस्ताराच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र त्याचे ना सत्ताधाऱ्यांना सोयरसुतक ना पालिका प्रशासनाला.
काँग्रेस सरकारने महाराष्ट्रापासून मुंबईचा लचका तोडून तो गुजरातला जोडण्याचा घाट घातला होता. मात्र ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी गर्जना करीत मुंबईकर उठले आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. या लढय़ात गिरणी कामगार मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले. फ्लोरा फाउंटन येथे २१ नोव्हेंबर १९५५ रोजी १४ जण हुतात्मे झाले. त्यानंतर हा लढा धगधगतच होता. १६ ते २० जानेवारी १९५६ या काळात व ३ जून १९५६ रोजी एकूण ९२ जण हुतात्मे झाले. या लढय़ात एकूण १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांचे मुंबईकरांना कायम स्मरण राहावे म्हणून १४ जणांनी हौतात्म्य पत्करलेल्या स्थळी ‘फ्लोरा फाऊंटन’मध्ये २१ नोव्हेंबर १९६१ रोजी ‘हुतात्मा स्मारक’ उभारण्यात आले. दरम्यानच्या काळात ‘हुतात्मा स्मारक’ स्थळाचे ‘हुतात्मा चौक’ असे नामकरण करण्यात आले. मुंबई महापालिका सभागृहात त्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. आता हा परिसर ‘हुतात्मा चौक’ म्हणूनच परिचित आहे.
चौकाच्या नामकरणात दुरुस्ती करण्यासाठी महापौर स्नेहल आंबेकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, ‘ए’,‘बी’,‘ई’ प्रभाग समिती अध्यक्ष जावेद जुनेजा आदींना पत्र पाठविले. अनेक वेळा या मंडळींच्या कार्यालयात खेटेही घातले. स्थानिक नगरसेवक गणेश सानप यांच्याही कानावर ही बाब घातली. परंतु या संदर्भात अद्याप कोणतीही हालचाल होऊ शकलेली नाही, अशी खंत भाऊ सावंत यांनी व्यक्त केली आहे. फ्लोरा फाउंटनच्या नामकरणाचा प्रस्ताव पालिका सभागृहात एकमताने मंजूर झाला आणि चौकाला ‘हुतात्मा चौक’ असे नाव दिले गेले. पण हा प्रस्ताव आजघडीला पालिकादरबारी नाही.
हा प्रस्ताव पालिकेच्या चिटणीस विभागात अथवा ‘ए’ विभाग कार्यालयाकडे असायला हवा होता. भाऊ सावंत यांच्या विनंतीवरून गणेश सानप यांनी पालिकेच्या चिटणीस विभागातील अधिकाऱ्यांकडे नामकरणाच्या मूळ प्रस्तावाची विचारणा केली. परंतु या प्रस्तावाची प्रत मिळू शकली नाही. तसेच पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाकडेही ही पत्र नाही. ‘हुतात्मा चौका’च्या नावात दुरुस्ती करण्यासाठी नामकरणाचा मूळ प्रस्ताव मिळणे आवश्यक आहे. मात्र तोच मिळत नसल्यामुळे ‘हुतात्मा स्मारक चौक’ नामकरण करण्यात अडसर निर्माण झाला आहे.
नामबदल कशासाठी?
संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्या स्मृती मुंबईकरांच्या मनात कायम राहाव्यात म्हणून ‘हुतात्मा स्मारक’ उभारण्यात आले. परंतु ‘हुतात्मा चौक’ या नावात ‘स्मारका’चा उल्लेखच नाही. त्यामुळे या परिसराचे नाव ‘हुतात्मा स्मारक चौक’ असे करावे, अशी मागणी संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचे अभ्यासक महादेव गोविंद ऊर्फ भाऊ सावंत यांनी केली आहे.