मुंबई : अमली पदार्थ तस्करीप्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची भीती घालून फसवणूक करणाऱ्या भामट्याला राजस्थान येथून अटक करण्यात ओशिवरा पोलिसांना यश आले. अटक आरोपीने मुख्य आरोपींना सायबर फसवणुकीसाठी मदत केल्याचा आरोप आहे. आरोपीने तक्रारदाराची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
शिशुपाल शर्मा असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार व्यावसायिक असून त्यांना फेब्रुवारीमध्ये एक दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने तो कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने तक्रारदारांना नाव व माहिती विचारली. ‘मरियम’ नावाने विमानतळावर तुमची काही वस्तू असून त्यात अमली पदार्थ आहेत. याप्रकरणात आरोपीने त्यांचा सायबर पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधून दिला. त्याने त्याचे नाव प्रदीप सावंत असे सांगून स्काईप आयडीवर व्हॉइस कॉल करण्यास सांगितला. कारवाईची भीती दाखवून आरोपीने त्यांना त्याच्या खात्यात साडेआठ लाख रुपये जमा करण्यास सांगितले.
हेही वाचा…महायुतीच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्या; म्हणाले “सर्वात आधी…”
पोलीस अधिकारी समोर न येता परस्पर पैशांची मागणी करीत असल्यामुळे तक्रारदारांना संशय आला. त्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला. तपासादरम्यान पोलिसांना बँक खात्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक राजस्थान रवाना झाले. पोलिसांनी तेथून शिशुपालला ताब्यात घेऊन अटक केली. शिशुपालचे औषधाचे दुकान आहे. मुख्य आरोपींनी त्याला काही पैसे खात्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिशुपालने त्याचे बँक खाते वापरायला दिले होते. पोलिसांनी तपास करून फसवणूक झालेली रक्कम गोठवली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात शिशुपालला अटक करण्यात आली असून याप्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.