मुंबई : अंधेरी पश्चिम येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या खासगी कंपनीच्या महाव्यवस्थापकाच्या खिडकीत शुक्रवारी पहाटे गोळीबार झाला. यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता समोरच्या खिडकीतून एअर पिस्तुलने गोळ्या झाडण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात जीवाला धोका निर्माण करणारी कृती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोरच्या इमारतीतील घरातून एअर पिस्तुल व छर्रे जप्त करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार करण रमण सहगल (४०) मुळचे कोलकात्यातील रहिवासी आहेत. ते आयटीसी कंपनीत महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्यांची पत्नीही हिदुस्तान युनिलिव्हर लि. कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. सहगल कामानिमित्त दिल्लीला गेले होते. गुरूवारी मध्यरात्री ते विमानाने मुंबईत आले. तक्रारीनुसार, शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास घरी पोहोचल्यावर ते झोपण्यापूर्वी मोबाइल तपासत होते. त्यावेळी खिडकीजवळ अचानक मोठा आवाज झाला.आवाजामुळे ते घाबरले. ते तातडीने टॉर्च घेऊन खिडकीजवळ गेले असता खिडकीला छीद्र पडल्याचे आणि खाली काचांचे तुकडे पडल्याचे निदर्शनास आले.

काचेमध्ये एक छर्रा त्यांना दिसला. त्यांनी पत्नीला उठवले आणि घडलेला प्रकार सांगितला.तक्रारदार सहगल पुन्हा छर्रा पडलेल्या ठिकाणी गेले असता समोरच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील घराचे दिवे सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथे चार-पाच व्यक्ती असल्याचेही आढळले. त्यामुळे तेथूनच गोळीबार झाल्याचे सहगल यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार स्थानिक उपायुुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता तो छर्रा एअर गनचा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सहगल यांच्या समोरच्या फ्लोरा इमारतीमधील १० व ११ व्या मजल्याची पाहणी केली.

इमारतीच्या ११ व्या मजल्यावर चार व्यक्ती होत्या. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे एअर पिस्तुल व फुगे फोडण्याचे छर्रे सापडले. ते पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी सहगल यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३ (५) व ३२४ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितेल. सहगल यांच्या घरातील छर्राही पुरावा म्हणून ताब्यात घेण्यात आला आहे.