मुंबई: सट्टा खेळण्यासाठी घरात पेईंग गेस्ट राहणाऱ्या महिलेची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या २५ वर्षीय तरूणाला पोलिसांनी अटक केली. आरोपीने यापूर्वीही तक्रारदार महिलेचे दागिने चोरले होते. फसवणुकीच्या रकमेतून आरोपी ऑनलाईन सट्टा खेळल्याचे निष्पन्न झाले. याबाबत ओशिवरा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तक्रारदार जोगेश्वरी पश्चिम येथील बेहराम बाग परिसरातील कांतीनगर येथे पेईंग गेस्ट म्हणून राहतात. २३ डिसेंबर, २०२३ रोजी त्यांच्या बॅगेतून २४ हजार रुपयांचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरले होते. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२३ ला त्यांच्या मोबाईल बँकिंग अॅपचा वापर करून बँकेतून पाच लाख रुपये हस्तांतरीत करण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदार महिलेने याप्रकरणी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी चोरी, फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
हेही वाचा… मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा; सोमवारी मुंबईचा हवा निर्देशांक ९८ वर
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक मोहन पाटील, मनीष श्रीधनकर, पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे हवालदार शैलेश शिंदे, पोलीस शिपाई विक्रम सरनोबत यांच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या बँक खात्यातून हस्तातरीत झालेल्या रकमेची पाहणी केली असता ती विविध बँक खात्यांमध्ये जमा झाल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यातील एक लाख ९५ हजार रुपये एका बँक खात्यात जमा झाली होती. त्याला जोडलेला मोबाईल क्रमांक महिला पेइंग गेस्ट म्हणून राहात असलेल्या घर मालकिणीच्या मुलगा मुस्तफा याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्या माहितीच्या आधारे मुस्तफाला गोरेगाव पश्चिम येथील मिठानगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅपची पाहणी केली असता त्याच्या बँक खात्यात एक लाख ९५ हजार रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपी Betbhai9.com या ऑनलाईन क्रिकेट बेटींग चालवणाऱ्या उज्जैन येथील टोळीशी संबंधित असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.