मुंबई : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, आता अमली पदार्थांच्या तस्करांवर भारतीय दंड संहितेअंतर्गत दाखल असलेले इतर गुन्हेही तपास यंत्रणांना लवकरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करणे सोपे होणार असल्याची माहिती राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी विभागातील सूत्रांनी दिली.
‘नॅशनल इंटिग्रेटेड डेटाबेस ॲान ॲरेस्टेड नार्को ॲाफेन्डर्स’ म्हणजे निदानʼ पोर्टलवर देशभरातील पाच लाखांहून अधिक तस्करांची माहिती उपलब्ध झाली आहे. या माहितीच्या आधारे अलीकडेच अमली पदार्थविरोधी विभाग तसेच महसूल गुप्तचर संचालनालयाने यशस्वी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केले होते. या प्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली. मात्र अटक करण्यात आलेल्यांवर कुठले गुन्हे दाखल आहेत किंवा नाही याची माहितीही निदानʼ पोर्टलला जोडली गेली पाहिजे, अशी मागणी तपास यंत्रणांकडून होत होती. `निदानʼमध्ये असलेली माहिती ही तस्करांवरील गुन्ह्यांबाबत होती. जेव्हा कारवाई होते तेव्हा अटकेतील व्यक्तीवर याआधी अमली पदार्थसंदर्भात कुठला गुन्हा नसेल वा भारतीय दंड संहितेतील कलमानुसार गुन्हा असेल तर ती माहिती उपलब्ध होत नव्हती. आता ही माहितीही लवकरच मिळणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.
२०१८मध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली होती. देशभरातील १२ लाख गुन्हेगारांचा तपशील उपलब्ध झाला आहे. आता भारतीय दंड संहितेनुसार दाखल झालेल्या सर्वच गुन्हेगारांचा तपशीलनिदानʼला जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे अमली पदार्थ तस्करांवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने इतर गुन्ह्यांचा तपशील उपयोगी पडू शकेल, असा दावाही या सूत्रांनी केला. निदानʼ पोर्टलवर देशभरातील तस्कर, गुन्हेगारांची माहिती उपलब्ध आहे. जुलै २०२२मध्ये याबाबत केंद्र सरकारने घोषणा केली.
ॲागस्टमध्ये प्रत्यक्ष नोंदणी सुरू झाली आणि नंतर दोन महिन्यांत पाच लाखांपेक्षा अधिक गुन्हेगारांचा तपशील उपलब्ध झाला आहे. ही माहिती फक्त तपास यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘क्राईम ॲंड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम’शी (सीसीटीएनएस) ही माहिती जोडली जाणार आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या गुन्हेगारांचा तपशील उपलब्ध होऊ शकणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.