लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दुसऱ्या तुळईच्या सर्व सुट्या भागांच्या जोडणीचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले असून २३ ऑगस्टपर्यंत ही जोडणी पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. असे असले तरी या तुळईचे सुटे भाग आणण्यात कंत्राटदाराने अक्षम्य उशीर केल्याचा ठपका ठेवून प्रशासनाने कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे आणि तीन कोटी रुपयांचा दंड करण्याचा इशाराही दिला आहे.

पुलाच्या कामाला उशीर झाल्यामुळे पुलाची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंत्याचीही बदली करण्यात आली आहे. दरम्यान, पुलाची तुळई बसवून दुसरी बाजू सुरू होण्यास आता मार्च २०२५ ची वाट पाहावी लागणार आहे.

आणखी वाचा-महापालिकेच्या बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्रात ३७० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण!

अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या तुळईचे भाग दिल्लीहून मुंबईत आणण्यास एप्रिलला सुरुवात झाली होती. त्यामुळे, हे सगळे भाग आल्यानंतर ते जोडून ३१ मेपर्यंत तुळई स्थापन करणे आणि पुलाचे पोहोच रस्ते तयार करणे व ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण पूल वाहतुकीसाठी सुरू करणे, असे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या तुळईचे सुटे भाग येण्यास उशीर झाला. त्यामुळे, महापालिका प्रशासनाचे सगळेच नियोजन कोलमडले असून नवीन वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, सप्टेंबर महिन्यात तुळई बसवण्याचे निश्चित करण्यात आले होते. आता तुळईचे सर्व भाग आले असून तुळईची जोडणीही करण्याचे काम सुरू झाले आहे. तुळईची जोडणी २३ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मात्र, त्यानंतर रेल्वेच्या हद्दीत तुळई बसवण्याच्या कामाकरिता रेल्वे मार्गावर ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्याकरिता दोन महिन्यांचा अवधी लागणार असून रेल्वेच्या हद्दीतील कामे संपवण्यासाठी १५ नोव्हेंबरची मुदत ठरवण्यात आली आहे. त्यानंतर पोहोच रस्ते बांधण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागणार असून प्रत्यक्ष पुलाची दुसरी बाजू सुरू होण्यास पुढील वर्ष उजाडणार आहे.

आणखी वाचा-एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

पावसाळ्यात रेल्वेच्या हद्दीतील कामे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक दिला जात नाही. त्यामुळे, ऑक्टोबरमध्येच तुळई बसवण्याचे काम होणार आहे. नंतर, तुळईवरील काँक्रीटीकरण, रेल्वेच्या हद्दीतील कामे आणि त्यासह पोहोच रस्ते ही कामे करावी लागणार आहेत. पोहोच रस्ते तयार होण्यासाठी पाच ते सहा महिने लागणार असून काम वेळापत्रकानुसार झाल्यास मार्च २०२५ पर्यंत पुलाची दुसरी बाजू सुरू होऊ शकेल.

तीन कोटी रुपये दंडाचा इशारा

दुसरी बाजूची तुळई बसवण्यासाठी सुटे भाग आणण्याकरीता कंत्राटदाराने उशीर केल्यामुळे कंत्राटदाराला पालिका प्रशासनाने नवीन वेळापत्रक दिले होते. मात्र, ते वेळापत्रक पाळणेही कंत्राटदाराला अवघड आहे. त्यामुळे, महापालिकेने कंत्राटदाराला नोटीस बजावली असून १५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वेच्या हद्दीतील कामे पूर्ण न झाल्यास तीन कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच, या प्रकरणी पुलाची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंत्यांलाही कारणे दाखवा नोटीस बजावून त्याच्यावर कारवाई का करून नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. त्याचवेळी, त्याची बदली करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.