सरावादरम्यान बालगोविंदांच्या मृत्यूचे कारण पुढे करत यंदादहीहंडी उत्सवातील झगमगाटाला आवर घालण्याची घोषणा करून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी निर्णयाची हंडी फोडण्यात आघाडी घेतली असली तरी त्यांच्या या निर्णयामुळे ठाण्यातील इतर शिवसेना नेत्यांची मात्र कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाडांचा अपवाद वगळला तर ठाण्यातील दहीहंडी उत्सवावर शिवसेनेचा वरचष्मा दिसून येतो. यंदाच्या वर्षी ध्वनिवर्धकाच्या आवाजावर पोलिसांनी घातलेले र्निबध, तसेच बालगोविंदासंबंधी आयोगाचे निर्देश लक्षात घेता यासंबंधी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करण्याचे शिवसेनेच्या गोटात ठरले होते. मात्र सरनाईकांच्या ‘पारंपरिक’ उत्सवाच्या घोषणेमुळे आमदार एकनाथ शिंदे यांच्या मंगळवारी अपेक्षित असलेल्या ‘आदेशा’तील हवाच निघून गेल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगली आहे.
ध्वनिवर्धकांच्या आवाजामुळे सुरू झालेल्या वादापासून स्वत:ला पद्धतशीरपणे दूर ठेवताना वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाडांना एकाकी पाडण्यात ठाण्यातील शिवसेना नेत्यांना काल-परवापर्यंत यश आले होते. पाच थरांपेक्षा अधिक उंचीची हंडी यंदा उभारायची नाही, असा निर्णय शिवसेनेच्या गोटात जवळपास ठरला होता. शिवसेनेच्या आयोजकांची एक बैठक आयोजित करून त्यानंतर हा निर्णय जाहीर करायचे, असेही ठरले होते. शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांचा सोमवारी भीमाशंकरचा दौरा ठरला. त्यामुळे यासंबंधी मंगळवारी पत्रकार परिषदेत निर्णय जाहीर करायचे ठरले. मात्र सरनाईक यांनी सोमवारीच ‘संस्कृती’ प्रतिष्ठानमार्फत दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार नाही, असा निर्णय जाहीर केल्याने स्वत: शिंदे यांची कोंडी झाल्याचे बोलले जाते. पक्षाचा एक आमदार झगमगाटाशिवाय उत्सव साजरा करत असताना त्याउलट भूमिका घेणे इतरांना कठीण जाणार आहे. यासंबंधी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘उद्याच बोलू’, अशी प्रतिक्रिया दिली. संकल्प प्रतिष्ठानचे रवींद्र फाटक यांनी मात्र ‘शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल’, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. सरनाईक यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.