मुंबई : आज देशाला विकासापेक्षा स्वातंत्र्याची गरज आहे. त्यासाठी देशातील राष्ट्रप्रेमी पक्ष इंडिया नावाने एकत्र आले आहेत, आमची लढाई ही हुकूमशाही रोखण्यासाठी आहे, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे  नेते अशोक चव्हाण व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी  बैठकीबाबतची भूमिका विशद केली.  मुंबई राजकीय क्रांतीचे केंद्र राहिले आहे. मुंबईतूनच ब्रिटिश सरकारला चले जावचा इशारा दिला होता, त्या दृष्टीने  बैठकीला महत्त्व आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.  परिवर्तन घडविण्यासाठी २८ पक्ष एकत्र आले आहेत, त्यांचे ६३ प्रतिनिधी बैठकीत सहभागी होतील, असे पवार यांनी सांगितले. आम्ही वेगवेगळय़ा विचारांचे असलो तरी हुकूमशाही रोखण्यासाठी देशप्रेमी पक्ष एकत्र आलो आहोत असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> केजरीवाल, अखिलेश आणि आता उद्धव ठाकरे, I.N.D.I.A च्या तिसऱ्या बैठकीच्या आधीच पंतप्रधान पदाचे तीन दावेदार

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार

शिवसेना व प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे, परंतु आता राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीत व राज्य स्तरावर महाविकास आघाडीत त्यांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. आंबेडकरांची इच्छा असेल तर इंडिया व महाविकास आघाडीत ते सहभागी होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.

केजरीवाल पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत – आतिशी

नवी दिल्ली : ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत’, असा खुलासा दिल्लीच्या शिक्षणंत्री आतिशी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केला. इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होण्यापूर्वीच आपच्या दोन नेत्यांनी पंतप्रधानपदासाठी अरिवद केजरीवाल यांचे नाव सुचवल्यामुळे आतिशी यांना त्यासंबंधी खुलासा करावा लागला.  आपच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी ‘पंतप्रधानपदासाठी अरिवद केजरीवाल यांच्या नावाचा प्रस्ताव देत आहे’, असे सांगितले होते.

एनडीए किंवा ‘इंडिया’बरोबर आघाडी नाही – मायावती

लखनौ : सर्व पक्षांना बसपबरोबर आघाडी करायची आहे, पण आपल्या पक्षाने एनडीए किंवा ‘इंडिया’ आघाडीबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा खुलासा बसपच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी बुधवारी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our fight against dictatorship says maha vikas aghadi leaders in india press conference zws
Show comments