मुंबई : उद्योजकांकडून राजकीय नेते व गुंडटोळ्या खंडणीखोरी करीत असल्याच्या तक्रारी काही प्रमाणात असल्या तरी राजकीय खंडणीखोरीला आमचे सरकार अजिबात थारा देणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत, अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून दिली. महाराष्ट्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हा उपक्रम पुन्हा सुरू होईल आणि नवीन उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांना ‘मैत्री’ या शासकीय संकेतस्थळावरून सर्व परवानग्या मिळतील, अशा घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२४ या वर्षातील महत्त्वाच्या घडामोडी, घटना आणि व्यक्तिमत्वे यांची नोंद घेणारे ‘लोकसत्ता वर्षवेध’ या विशेषांकाचे तसेच ‘लोकसत्ता’मध्ये २०१७ ते २०२४ या काळात प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांचा संग्रह असलेल्या ‘लोकसत्ता अग्रलेख’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी झाले. ‘एक्स्प्रेस टॉवर’च्या हिरवळीवर आयोजित करण्यात आलेल्या शानदार सोहळ्यास राज्य सरकारमधील मंत्री, राजकीय नेते यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, उद्योग विश्वातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यात फडणवीस यांनी महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, भाजपची वाटचाल, युती सरकारमधील भांडणे, उद्योजकांकडून वसूल करण्यात येत असलेली खंडणी, औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्राची कामगिरी आदी विविध मुद्द्यांवर दिलखुलासपणे भाष्य केले.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व राज्यात काही ठिकाणी उद्योजकांकडून येत असलेल्या खंडणीच्या तक्रारी आदी पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी खंडणीखोरीला सरकारकडून अजिबात थारा किंवा संरक्षण मिळणार नाही, असे स्पष्ट केले. राजकीय खंडणीखोर किंवा स्थानिक गुंड हे सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करतात. सत्ताधारी नेत्यांबरोबर संबंध असल्याचे दाखवून आमच्या माणसांनाच नोकऱ्या व कामे मिळावीत, कंत्राटे मिळावीत, यासह खंडणीची मागणी केली जाते. पण हे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नसून कठोर कारवाईचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आपण स्वबळावर निवडणूक लढणार, असे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना काही वेळा सांगावे लागते. पण महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी युतीचेच राजकारण गेली अनेक वर्षे चालत आले आहे व आणखी काही काळही सुरू राहील, असे सूचक वक्तव्य करीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची महायुती कायम राहील, असे फडणवीस म्हणाले. युतीतील तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुसंवाद असून युती सरकारचा राज्यकारभार सुरळीतपणे सुरू आहे, असे सांगून फडणवीस यांनी महायुती सरकारची १०० दिवसांच्या कामगिरी १५ एप्रिल रोजी जनतेसमोर ठेवली जाईल, असे सांगितले.

दावोसमधील करारांची १०० टक्के अंमलबजावणी

औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात सर्वप्रथम क्रमांकावर पुन्हा आला असून दावोसमध्ये नुकतेच विक्रमी १६ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार सरकारने केले असून त्यापैकी ९८ टक्के विदेशी गुंतवणूक आहे. त्यापैकी अनेकांना जमिनी व देकारपत्रेही देण्यात आली असून करारांची १०० टक्के अंमलबजावणी होईल व प्रत्यक्ष गुंतवणूक साकारलेली दिसून येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. उद्योगस्नेही वातावरण, पूरक उद्योगसाखळी आणि उद्योग सुरु करण्यासाठी जलदगतीने मान्यता देण्यात येत असल्याने महाराष्ट्राला उद्योजकांची पहिली पसंती आहे. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उद्योग विभागाच्या ‘ मैत्री ’ संकेतस्थळाच्या माध्यमातून आवश्यक परवानग्या ऑनलाइन पद्धतीने व एक खिडकी योजनेद्वारे मिळतील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

– वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र ‘मेरिटाइम’ शक्ती बनेल.

– मुलीच्या दहावी परीक्षेनंतर मी ‘ वर्षा ’ बंगल्यावर रहायला जाणार

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ मुळे विधानसभेत दणदणीत विजय

– महाराष्ट्रात युतीचे राजकारण आणखी काही काळ सुरू राहील

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our government will not tolerate political extortion cm devendra fadnavis assurance from loksatta platform zws