सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. “आमचा तपास योग्य दिशेने सुरु होता. कुपर रुग्णालयाने दिलेला अहवालही योग्यच होता. सर्वोच्च न्यायालयानेही तपासाबाबत समाधान व्यक्त केलं होतं.” असंही परमबीर सिंह म्हणाले. सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली. त्या सोशल अकाऊंटची चौकशी सुरु असल्याचंही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं. तसंच काही माध्यम संस्थांनी केलेल्या बदनामीविरोधात निवृत्त आयपीएस कोर्टात गेल्याचं सिंह यांनी सांगितलं.

“एम्सच्या डॉक्टरांनी पॅनलनेही सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयकडे सोपवला आहे. कुपर हॉस्पिटल, फॉरेन्सिक एक्स्पर्ट आणि आमच्या तपासात ही आत्महत्या असल्याचंच म्हटलं होतं. एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनलनेही तसाच अहवाल दिल्याचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. सत्य कायम समोर येतं” असंही परमबीर सिंह यांनी सांगितलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“सोशल मीडियावर अनेक बनावट अकाउंट तयार करण्यात आले होते. त्यातून फक्त शिवीगाळ केला जात होता. चुकीची माहिती पसरवली जात होती. सायबर एक्स्पर्ट याचा तपास करत आहेत, या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.” अशी माहिती परमबीर सिंह यांनी सांगितलं. दरम्यान “काही मीडिया हाऊसनेही मुंबई पोलिसांविरोधात मोहीम राबवून प्रतिमा मलीन केली होती. त्यांच्या विरोधात निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यावर ८ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आम्हाला विश्वास आहे की हायकोर्टही यावर योग्य निर्णय देईल.”

Story img Loader