मुंबई : नव्या विधानसभेत अनुसूचित जातींसाठी (एससी) राखीव असलेल्या २९ मतदारसंघांपैकी २० ठिकाणी ‘हिंदू दलित’ समाजाचे आमदार निवडून आले आहेत. यात सर्वाधिक १० आमदार एकट्या भाजपचे असले तरी त्या पक्षाचा एकही बौद्ध आमदार निवडून आलेला नाही. अनुसूचित जातींमधील वंचित घटकांना प्रतिनिधित्व देण्यात मात्र भाजपला यश आले आहे.

महायुती सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासंदर्भात समिती नेमून ‘हिंदू दलित’ जातींना चुचकारले होते. राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ११.४५ टक्के आहे. पैकी १०.९ टक्के चर्मकार, ६२.२ टक्के बौद्ध आणि १९.३ टक्के मातंग जातीचे मतदार आहेत. एससी आरक्षणात एकूण ५९ जाती असून २९ मतदारसंघ राखीव आहेत. मुंबईतील खुल्या मतदारसंघातून अनुसूचित जातीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. महायुतीकडे अनुसूचित जातीच्या २० तर महाविकास आघाडीकडे १० आमदारांचे संख्याबळ आहे. एससीमधील वंचित घटकांना भाजपने प्राधान्याने उमेदवारी दिली होती. परिणामी, भाजपकडे चर्मकार, बुरुड, मातंग, वाल्मीकी, ढोर या जातींचे आमदार आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ‘ज्या जाती प्रश्न विचारतात, शहाण्या होतात, त्या जातीतल्यांना उमेदवारी दिली जात नाही,’ अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक व ‘हिंदू दलितां’ची बौद्ध धर्मांतर चळवळ उभारणारे नेते लक्ष्मण माने यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत ३५ लाख लाभार्थी!

बौद्धांना वगळून राजकारण होऊ शकत नाही. भाजपचे बौद्धविरोधी धोरण नाही. उत्तर नागपूरमधून भाजपने बौद्ध उमेदवार दिला होता. तो पराभूत झाला. अर्जुनी-मोरगावमध्ये आमच्याकडे जिंकणारा बौद्ध उमेदवार होता, पण वाटपात ती जागा राष्ट्रवादीकडे गेली.

-भाई गिरकर, राज्य समन्वयक, भाजप अनुसूचित जाती संपर्क समिती

पक्षनिहाय आकडेवारी

●भाजप : १० (४ चर्मकार, २ बुरुड, २ मातंग, १ वाल्मीकी, १ ढोर)

●शिवसेना (शिंदे) : ४ (२ बौद्ध, २ चर्मकार)

●राष्ट्रवादी (अप) : ५ (३ बौद्ध, १ चर्मकार, १ खाटीक)

●काँग्रेस : ४ (३ बौद्ध, १ चर्मकार)

हेही वाचा : शुद्ध हवेसाठी गोरगाववासियांची धडपड

●शिवसेना (ठाकरे) : ४ (१ बौद्ध, १ चर्मकार, १ खाटीक, १ बेडाजंगम)

●राष्ट्रवादी (शप) : २ (१ बौद्ध, १ खाटीक)

●जनसुराज्य : १ (चर्मकार)

एकूण : ३०

Story img Loader