मुंबई : मुंबईत सप्टेंबरमध्ये अधूनमधून कोसळलेला मुसळधार पाऊस आणि कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले होते. बदलत्या वातावरणामुळे मुंबईमध्ये सप्टेंबरमध्ये हिवताप व डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम आहे. सप्टेंबरमध्ये हिवतापाचे १ हजार २६१ रुग्ण, तर डेंग्यूचे १ हजार ४५६ रुग्ण आढळलेत. ऑगस्टच्या तुलनेत हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र अन्य चिकुनगुन्या, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ, स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.
सप्टेंबर सुरू झाल्यापासून मुंबईमध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मात्र त्यानंतर पडणाऱ्या कडक उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. ऊन – पावसाच्या खेळामुळे डासांच्या उत्पत्तीस अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. मुंबईत सप्टेंबरमध्ये वातावरण बदलामुळे हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून सप्टेंबरमध्ये हिवताचाचे १ हजार २६१, तर डेंग्यूचे १ हजार ४५६ रुग्ण सापडले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये हिवतापाचे १ हजार १७१ आणि डेंग्यूचे १ हजार १३ रुग्ण सापडले होते. हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असली तरी अन्य साथीच्या आजारांमध्ये मात्र लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास येते. मुंबईत सप्टेंबरमध्ये चिकुनगुन्याचे १५६, लेप्टो ७५, गॅस्ट्रो ४६६, कावीळ १२९, स्वाईन फ्ल्यूचे ६२ रुग्ण सापडले आहेत.
हेही वाचा – मुंबई : रुग्णालयात पाच वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक
९ महिन्यांत ४१ जणांचा मृत्यूजानेवारी ते सप्टेंबर २०२४ दरम्यान मुंबईमध्ये विविध साथीच्या आजारांनी ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लेप्टोस्पायरोसिसचे १८, डेंग्यूचे १२, हिवताप व स्वाईन फ्ल्यूचे अनुक्रमे ५ आणि हेपटायटिसने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत सापडला झिकाचा पहिला रुग्ण
मुंबईमध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला असून ६३ वर्षांच्या सहव्याधीग्रस्त महिलेला झिका झाल्याचे निदर्शनास आले आहे. या महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती स्थिर आहे.
ताप आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वत: कोणतेही औषध घेणे टाळा. घराजवळील मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाना किंवा रुग्णालयात जाऊन त्वरित सर्व तपासण्या करून डॉक्टरांचा सल्ला घ्या. – डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका