मुंबई : दहावीचा वाढलेला निकाल, विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या अपेक्षा, महाविद्यालयांचे चढे पात्रता गुण (कट ऑफ) आणि प्रत्येक फेरीसाठी स्वतंत्रपणे महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम देण्याची मुभा यांमुळे अकरावी प्रवेशाचे विद्यार्थ्यांचे गणित चुकले असून दुसर्या फेरीनंतरही १ लाख ७१ हजार ७५४ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील प्रवेश मिळून २ लाख ८७ हजार ११६ (७१.६१ टक्के) जागा रिक्त आहेत. अद्यापही अगदी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही पसंतीच्या महाविद्यालयांत प्रवेश मिळालेला नाही.
यंदा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील जागांसाठी तब्बल २ लाख ८५ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी दुसऱ्या नियमित फेरीनंतर १ लाख १३ हजार ८४९ (३९.८६ टक्के) विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. दुसऱ्या नियमित फेरीअंतर्गत केंद्रीय प्रवेशाच्या उपलब्ध असणाऱ्या १ लाख ९६ हजार १५७ जागांसाठी १ लाख ७५ हजार ८ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी ७३ हजार ४३८ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय देण्यात आले. या फेरीअंतर्गत केंद्रीय प्रवेशाच्या जागांसाठी अर्ज केलेल्या १ लाख १ हजार ५७० विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालेले नाही. महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तसेच, विविध कारणास्तव ६६ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले आणि ९५ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले.
हेही वाचा…मनोरीतल्या रस्त्यांची दुरवस्था, मीरा भाईंदर पालिकेच्या बसचालकांची मुंबई महापालिकेविरोधात तक्रार
तिसऱ्या फेरीत काय?
तिसऱ्या नियमित फेरीसाठी केंद्रीय प्रवेशाच्या एकूण १ लाख ७० हजार ३२९ जागा रिक्त आहेत. तसेच, दुसऱ्या नियमित फेरीअंतर्गत २० हजार ३० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले. त्यापैकी १४ हजार ७८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. विविध कारणास्तव २९ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले आणि ३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. तर ४ हजार ५६ विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेणे टाळले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाणार आहे.
‘तिसरी प्रवेश यादी’ सोमवार, २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश निश्चित केला नसेल, असे विद्यार्थी १७ जुलै रात्री १० वाजेपर्यंत नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात आणि महाविद्यालय पसंतीक्रम अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २२ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग १ व भाग २ हा १७ जुलैपूर्वी लॉक केलेला असेल, अशाच विद्यार्थ्यांचा तिसऱ्या प्रवेश यादीसाठी विचार केला जाणार आहे.
हेही वाचा…नेरुळमध्ये आढळलेल्या दुर्मीळ सागरी पक्ष्याचा मृत्यू
कोट्यातील प्रवेशाचे वेळापत्रक
संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन या कोट्यात प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी १७ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज लॉक करायचा आहे. त्यानंतर १९ जुलै रोजी संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश यादी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २२ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोट्यातील प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.
दुसऱ्या नियमित फेरीनंतर प्रवेशप्रक्रियेची स्थिती
फेरी, कोटा – उपलब्ध जागा – प्रवेश घेतलेले विद्यार्थी – रिक्त जागा
केंद्रीय प्रवेश – २ लाख २९ हजार ८८६ – ८२ हजार ८५२ – १ लाख ५१ हजार ७२१
संस्थात्मक प्रवेश – २६ हजार ३१४ – ७ हजार ३५३ – १४ हजार ९३५
अल्पसंख्यांक कोटा – १ लाख ७ हजार २५५ – २१ हजार ८१२ – ८५ हजार ४४३
व्यवस्थापन कोटा – १८ हजार ६६२ – १ हजार ८३२ – १६ हजार १६९
एकूण – ३ लाख ८२ हजार ११७ – १ लाख १३ हजार ८४९ – २ लाख ६८ हजार २६८