मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत बुधवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही अवधीतच मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने, रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वे सेवा मंदावली. विद्याविहार – मुलुंडदरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचल्याने धिमी लोकल सेवा ठप्प झाली. परिणामी, लाखो प्रवाशांना तीन – चार तास लोकलमध्ये तिष्ठत बसावे लागले. बुधवारी संपूर्ण दिवसभरात १०० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तसेच पावसामुळे मेल-एक्स्प्रेस सहा ते आठ तास खोळंबल्या होत्या.

हेही वाचा >>> हाजी अली दर्गा बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या फोनकॉलनंतर खळबळ; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई आणि आसपासच्या परिसरात बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. मुंबई शहर आणि उपनगरांत सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. परिणामी, ठिकठिकाणच्या सखलभागात पाणी साचू लागले. संततधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. अनेक ठिकाणी दोन फूट पाणी साचल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याने संध्याकाळी घरी निघालेल्या नागरिकांचे अतोनात हाल झाले.

पावसाच्या जोर वाढल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाला. विद्याविहार – मुलुंडदरम्यान विविध भागात रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बुधवारी रात्री ८.१० च्या सुमारास मध्य रेल्वेवरील धिमी मार्गिका ठप्प झाली. त्यामुळे ठाणे, कल्याण, कर्जत, खोपोली, कसारा आणि सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा कोलमडली. अनेक लोकल दादर – घाटकोपरदरम्यान दोन ते तीन तास एकाच ठिकाणी उभ्या होत्या.

हेही वाचा >>> आरबीआय मुख्यालयात बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर राहणं भोवलं, १२ पोलिसांचं निलंबन

बुधवारी संपूर्ण दिवसभरात मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरील ७० ते ८० लोकल फेऱ्या आणि हार्बर मार्गावरील १५ ते २० लोकल फेऱ्या रद्द झाल्या. तर, रेल्वेची देखभाल-दुरुस्ती आणि मेल-एक्स्प्रेसमुळे गुरुवारी लोकल सेवा विलंबाने धावत होती. तर, ८ ते १० लोकल रद्द करण्यात आल्या.

मेल-एक्स्प्रेसचा खोळंबा

दादरवरून रात्री १२.०५ वाजता सुटणारी तुतारी एक्स्प्रेस बुधवारी रात्री १.३३ वाजता सुटली. तसेच पनवेलला रात्री १.१० वाजता पोहचण्याऐवजी रात्री २.४६ वाजता पोहचली. त्यामुळे प्रवाशांना दीड तास एक्स्प्रेसची वाट पाहावी लागली. मंगळुरू सुपरफास्ट एक्स्प्रेस रात्री ९.५४ वाजता सुटणार होती. मात्र, या एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करून ती रात्री १२.३० वाजता सुडण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, सीएसएमटीवरून ही एक्स्प्रेस रात्री ३.१० वाजता सुटली. देवगिरी एक्स्प्रेस, महानगरी सुपरफास्ट एक्स्प्रेस, सिद्धेश्वर एक्स्प्रेस, बनारस एक्स्प्रेस, पुरी सुपरफास्ट एक्स्प्रेस, मुंबई – एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस प्रचंड विलंबाने धावत होत्या.

कमी कालावधीत जास्त पाऊस

कमी कालावधीत सुमारे २०० मिमी पाऊस पडल्याने रेल्वे मार्गावर पाणी साचले. मात्र, यामुळे पूर्णपणे लोकल सेवा ठप्प झाली नव्हती. लोकल विलंबाने धावत होत्या. यावेळी १५० पाॅइंट यंत्रे पाण्याखाली होती. परंतु, ही यंत्रे जलरोधक केल्याने त्यात बिघाड झाला नाही. तसेच गतवर्षी पाणी साचलेल्या भागात उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तेथे पाणी साचले नाही. मात्र बुधवारी अन्यत्र पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे पाण्याचा उपसा करणे कठीण होते. पाणी साचलेल्या नव्या ठिकाणाचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात येतील. – रजनीश कुमार गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे

* मुसळधार पावसामुळे बेस्ट बस सेवाही विस्कळीत झाली होती. पाणी साचल्याने नियमित मार्गाऐवजी पर्यायी मार्गाने बस धावत होत्या. तसेच सायंकाळी अनेक बस स्थानकांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील ७ आणि स्वमालकीच्या २१ बसमध्ये बिघाड झाला होता.

* बुधवारी सायंकाळी मुंबई विमानतळावर मुसळधार पाऊस कोसळल्याने विमान सेवेवर परिणाम झाला. पावसामुळे १४ विमाने दुसऱ्या विमानतळावर वळवण्यात आली. यापैकी ४ विमाने अहमदाबाद , ७ विमाने हैदराबाद, २ विमाने गोवा आणि एक उदयपूर येथे वळवण्यात आले.