मुंबई : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी १३ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहे. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमांतूनही ठिकठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे.राम नवमीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. राम मंदिरांमध्येही मोठ्याप्रमाणात भाविक गर्दी करतात. यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून शहरभर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी २० उपायुक्त, ५१ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह २५०० पोलीस अधिकारी, ११ हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासह महत्त्वाच्या ठिकाणांवर राज्य राखीव पोलीस दलाच्या ९ प्लाटून, शीघ्र कृती दल व गृहरक्षक दल तैनात करण्यात येणार आहेत.
सराईत आरोपींची तपासणी
त्याशिवाय शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी तीन-चार दिवसांपासून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली आहे. विशेष करून शहरातून तडीपार करण्यात आलेल्या ९८४ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली होती. त्यातील ४०० हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील तीन व्यक्ती तडीपारीच्या कारवाईनंतरही मुंबईत सापडले. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरातील २५०० व्यक्तींची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ५०० हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यता आली. त्यातील ९३ आरोपी सापडले.
वाहतूक पोलीसही सज्ज
शहरातील वडाळा, दादरसह विविध ठिकाणी राम मंदिर परिसरात मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता परिसरातील मार्गिकांवरही वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्याशिवाय मिरवणूका, पालखी सोहळ्यामुळे वाहतूकीवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. विशेष करून रविवार असल्यामुळे मोठ्याप्रमाणात भाविक शहरातील राम मंदिरांमध्ये येण्याची शक्यता आहे.
समाज माध्यमांवरही लक्ष
राज्यात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग समाज माध्यमांवरील हालचालींवरही लक्ष ठेवले आहे. त्यानुसार आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी गुढीपाड्याला मालाड परिसरातही दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यात जमावाने काही तरूणांना मारहाण केली होती. धार्मिक स्थळाजवळून झेंडा घेऊन जात असल्यामुळे हा वाद झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती.