१६४ प्रकरणात गुन्हा दाखल
मुंबई
मुंबई महापालिकेने गेल्या वर्षभरात तब्बल १६ हजाराहून अधिक अनधिकृत फलक, भित्तीफलक हटवले आहेत. त्यात राजकीय आणि धार्मिक फलकांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यापैकी १६४ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फलक हटवल्याचा दावा पालिकेने केले असला तरी मुंबईत अनेक ठिकाणी असे अनधिकृत फलक आजही सर्रास दिसतात.
शहराला बकाल करणाऱ्या अनधिकृत फलकांचा वाद आतापर्यंत अनेकदा न्यायालयात पोहोचला आहे. न्यायालयाने अनेकदा राज्य सरकारला व मुंबई महापालिकेला या प्रकरणी खडसावले आहे. मात्र तरीही अद्याप फलकांबाबतचे धोरण येऊ शकलेले नाही. त्यामुळेच मुंबईत विविध प्राधिकरणांच्या व खाजगी मालमत्तांच्या जागेत असे फलक सर्रास लावले जातात.
हेही वाचा >>> मुंबई : मेट्रो ११ मार्गिका अखेर एमएमआरसीकडे; प्रकल्प एमएमआरसीला देण्यास नगर विकास विभागाची संमती
पालिकेने जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुंबईतून तब्बल १६३६० अनधिकृत फलक हटवले. यामध्ये ९७१९ धार्मिक स्वरुपाचे तर ४८२३ राजकीय फलक आहेत. केवळ १८१८ फलक हे व्यावसायिक स्वरुपाच्या जाहिराती आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांना पालिका प्रशासनाने ही माहिती दिली. यामध्ये ८८४ प्रकरणी पोलीसात तक्रार करण्यात आली असून १६४ प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर ९६१ प्रकरणात खटले दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, जे राजकीय कार्यकर्ते, प्रतिनिधी वारंवार अनधिकृतपणे फलकबाजी करतात त्यांच्याकडून पालिकेने फलक उतरवण्याचा खर्च वसूल करावा व त्यांच्या थकबाकीच्या रकमेबाबत निवडणूक आयोगालाही कळवावे, अशी मागणी यादव यांनी केली आहे.
गेल्या वर्षभरात कारवाई करून पाडण्यात आलेले फलक … १६३६०
धार्मिक फलक ….९७१९
राजकीय ….४८२३
व्यावसायिक ….१८१८
पोलिसांत तक्रार ….८८४
खटले दाखल ….९६१
गुन्हे दाखल …..१६४