मुंबई : गेल्या वर्षभरात ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरून दोन कोटी मुंबईकरांनी प्रवास केला असून या दोन्ही मेट्रो मार्गिकांना प्रवाशांकडून पसंती मिळत आहे. त्यामुळेच आजघडीला दर दिवशी सरासरी एक लाख ६० हजार प्रवासी या मार्गिकांवरून प्रवास करीत आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांतील पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला असून याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या दोन्ही मार्गिकांचा दुसरा टप्पा १९ जानेवारी २०२३ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यानंतर या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या असून आता या मार्गिकांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचा दावा एमएमआरडीए आणि महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) केला आहे. या दोन्ही मार्गिकांवरून एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२३ दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या दोन कोटीवर पोहोचली आहे.
पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर या दोन्ही मार्गिकांवर दर दिवशी मेट्रोच्या १७२ फेऱ्या होत होत्या. दिवसाला सरासरी ३० हजार ५०० प्रवासी मेट्रोतून प्रवास करीत होते. जानेवारीमध्ये ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा सुरू झाला आणि या मार्गिकांवर मेट्रो पूर्ण क्षमतेने धावू लागल्या. त्यानंतर प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली. त्यामुळेच प्रति दिन प्रवासी संख्या ३० हजार ५०० वरून एक लाख ६० हजारावर पोहोचली. वर्षभरात प्रवासी संख्येने दोन कोटीचा पल्ला पार केला आहे. त्याच वेळी ‘मुंबई-१’ या एकात्मिक तिकीट प्रणाली कार्डलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ८१ हजार कार्ड विकली गेले आहेत.
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांमधून आतापर्यंत दोन कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. ‘मुंबई-१’ कार्डलाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यापुढेही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
एस. व्ही. आर. श्रीनिवास महानगर आयुक्त आणि अध्यक्ष, एमएमएमओसीएल