मुंबई : राज्यात १८ ते ५९ वयोगटासाठी मोफत उपलब्ध केलेल्या लसीकरणाचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्यातील दैनंदिन लसीकरणात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.
सरासरी दरदिवशी सुमारे सव्वा दोन लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. राज्यात जुलैपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी व्हायला सुरुवात झाल्यावर लसीकरणाचा जोरही कमी झाला होता. या काळात सरासरी दैनंदिन लसीकरण सुमारे ६० हजारांवर आले. १८ ते ५९ वयोगटासाठी मोफत वर्धक
मात्रा सुरू केल्यावर मात्र हे लसीकरण आता दोन लाखांच्याही पुढे गेले आहे. बुधवारी राज्यात २ लाख ४० जणांचे लसीकरण केले गेले.
वर्धक मात्रेला मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद वाढला असून एकूण लसीकरणातील सुमारे ५५ टक्के लसीकरण हे वर्धक मात्रेचे होते आहे. बुधवारी राज्यात १८ ते ५९ वयोगटातील सुमारे १ लाख ३४ हजार जणांनी वर्धक मात्रा घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १२ हजार ८३० जणांचे लसीकरण मुंबईत झाले आहे. तर त्या खालोखाल ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये वर्धक मात्रेचे लसीकरण झाले आहे.
इतर जिल्ह्यांमध्येही वर्धक मात्रेच्या लसीकरणाला प्रतिसाद वाढत असल्यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाच हजारांपेक्षाही नागरिकांनी वर्धक मात्रा घेतलेली आहे.
राज्यातील लसीकरण
* वर्धक मात्रा : १४ लाख २७ हजार
* पहिली मात्रा : ९ कोटी ११ लाख
* दुसरी मात्रा : ७ कोटी ५३ लाख
* वर्धक मात्रा न घेणारे : ४८ लाख २९ हजार