मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मंगळवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. या यादीनुसार अकरावी प्रवेशासाठी २ लाख ३८ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, त्यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ८१२ इतकी आहे. सर्वाधिक १ लाख २३ हजार ७७४ अर्ज वाणिज्य शाखेसाठी आले असल्याने विद्यार्थ्यांची वाणिज्य शाखेला पसंती असल्याचे दिसून येत आहे.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी सकाळी विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये प्रदर्शित करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये १०० टक्के गुण मिळालेले नऊ विद्यार्थी असून, ९९ ते ९९.९९ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५४ इतकी आहे. ९५ ते ९८.९९ टक्के असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ७१५ तर ९० ते ९४.९९ टक्के असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ०३४ इतकी आहे. गुणवत्ता यादीतील एकूण २ लाख ३८ हजार ९३४ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १ लाख २३ हजार ७७४ विद्यार्थांनी वाणिज्य शाखेला पसंती दिली आहे. त्यामुळे यंदाही वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याचे दिसून आले. त्याखालोखाल विज्ञान शाखेसाठी ९३ हजार ८९५ तर कला शाखेसाठी केवळ २० हजार ४२९ विद्यार्थांनी अर्ज केला आहे.

हेही वाचा…मुंबई : भरधाव मोटारीच्या धडकेत तिघे जखमी, पोलिसांच्या अंगावरही गाडी घालण्याचा प्रयत्न; खार लिकिंग रोड येथील घटना

टक्केवारी – विद्यार्थी संख्या

१०० टक्के – ९
९९ ते ९९.९९ टक्के – ५४
९५ ते ९८.९९ टक्के – ३७१५
९० ते ९४.९९ टक्के – १४०३४
८० ते ८९.९९ टक्के – ४७२६४
८० ते ८९.९९ टक्के – ११२२८७३
५९.९९ ते त्यापेक्षा खालील – ६०९८५

शाखानिहाय विद्यार्थी

शाखा : विद्यार्थी संख्या
कला : २०४२९
वाणिज्य : १२३७७५
विज्ञान : ९३८९५
एचएसव्हीसी : ८३६

हेही वाचा…विशाळगड येथे बकरी-ईद, उरूसनिमित्त कुर्बानीस परवानगी, आदेशाचा विपर्यास केल्यावरून उच्च न्यायालयाकडून स्थानिक प्रशासनाची कानउघाडणी

ऑनलाइन तक्रार करण्याचे आवाहन

अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी सकाळी जाहीर करण्यात आली. ही यादी विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी १५ जूनपर्यंत प्रवेशाचा भाग – २ पूर्ण भरून अर्ज ऑनलाइन सादर केले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी mumbai.11thadmission.org.in या प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर लॉगीन ऑप्शनमध्ये जात प्रवेशाची स्थिती तपासून घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांला सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये काही तक्रार असल्यास विद्यार्थ्यांनी लॉगीनमध्ये १८ ते २१ जूनदरम्यान ऑनलाइन तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई कार्यालयाने केले आहे.