मुंबई : कोणतीही लक्षणे दिसल्याशिवाय नागरिक आजारावरील उपचारासाठी डॉक्टरकडे जात नाहीत. परंतु सुमारे २५ टक्क्यांंहून अधिक नागरिकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर, हृदय रोग यांसारख्या आजारांची कोणतीच लक्षणे आढळली नाहीत, मात्र तपासणीअंती ते या आजाराने ग्रस्त असल्याचे नुकत्याच सादर जालेल्या ‘हेल्थ ऑफ द नेशन २०२५’ अहवालामध्ये स्पष्ट झाले. त्यामुळे ‘लक्षणांची वाट पाहू नका – प्रतिबंधात्मक आरोग्याला प्राधान्य द्या’ असा सल्ला नागरिकांना अहवालामध्ये देण्यात आला आहे.
देशातील जवळपास २५ लाखांपेक्षा अधिक व्यक्तींच्या तपासणी अहवालांच्या आधारे अपोलो रुग्णालयाने ‘हेल्थ ऑफ द नेशन २०२५’ अहवाल तयार केला. यामध्ये अनेक व्यक्तींना कोणतीही लक्षणे जाणवत नसली तरी ते विविध आजारांने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले. तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी २६ टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाब, २३ टक्के व्यक्तींना मधुमेहाचा त्रास होता, परंतु त्यांना कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचे एक प्रमुख कारण उच्च रक्तदाब आहे. सुमारे ४ लाख ५० हजार व्यक्तींच्या तपासणीमध्ये २६ टक्के व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त होत्या. या व्यक्तींमध्ये बहुतांश कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्याचप्रमाणे हृदयासंदर्भात कोरोनरी कॅल्शियम स्कोअरिंग या तपासणीमध्ये लक्षणे नसलेल्या व्यक्तींपैकी ४६ टक्के व्यक्तींमध्ये कॅल्शियमचे साठे आढळले. हे एथेरोस्क्लेरोसिसचे प्राथमिक लक्षण आहे. यापैकी २५ टक्के नागरिकांना ऑब्स्ट्रक्टिव्ह कोरोनरी आर्टरी डिसीज होता. कॅल्शियमचे साठे असलेल्यांपैकी २.५ टक्के व्यक्ती ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते.
‘ड’, ‘बी १२’ जीवनसत्त्वाची कमतरता
तपासणी केलेल्या नागरिकांपैकी ४५ टक्के महिला आणि २६ टक्के पुरुषांमध्ये अशक्तपणा आढळून आला. ७७ टक्के महिला आणि ८२ टक्के पुरुषांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता, तर ३८ टक्के पुरुष आणि २७ टक्के महिलांमध्ये ‘बी १२’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळून आली. ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांमध्ये ‘बी १२’ जीवनसत्त्वाची कमतरता प्रकर्षाने जाणवली. यापैकी ४९ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिलांमध्ये ‘बी १२’ जीवनसत्त्वाची कमतरता होती.
विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा वेगाने वाढतोय
प्राथमिक शाळेतील ८ टक्के विद्यार्थ्यांचे वजन जास्त असल्याचे किंवा ते लठ्ठ असल्याचे आढळून आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण २८ टक्क्यांपर्यंत आढळले, तर १९ टक्के महाविद्यालयीन विद्यार्थी पूर्व उच्च रक्तदाबाने ग्रस्त असल्याचे आढळून आले. जीवनशैली आणि आहारातील बदलांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा वेगाने वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
मद्यप्राशन न करणाऱ्यांनाही फॅटी लिव्हरचा त्रास
मद्यप्राशन करणाऱ्यांनाच फक्त फॅटी लिव्हरचा त्रास होतो, असा एक समज आहे. मात्र लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाशी संबंधित एक महत्त्वाचा आजार म्हणून फॅटी लिव्हर समोर येत आहे. तपासणी केलेल्या २ लाख ५७ हजार १९९ पैकी ६५ टक्के व्यक्तींना फॅटी लिव्हरचा त्रास असल्याचे आढळून आले. मात्र त्यापैकी जवळपास ८५ टक्के व्यक्ती या मद्य सेवन न करणाऱ्या होत्या.
रजोनिवृत्तीनंतर समस्यांमध्ये वाढ
रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. रजोनिवृत्तीपूर्वी मधुमेहाचे प्रमाण १४ टक्के असून रजोनिवृत्तीनंतर ते ४० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले आहे. लठ्ठपणा ७६ टक्क्यांवरून ८६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे आणि फॅटी लिव्हरचा त्रास ५४ टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचा धोका वाढतोय
या अहवालामध्ये चारपैकी एका व्यक्तीला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचा धोका असल्याचे म्हटले आहे. लठ्ठपणा, हृदयरोग आणि दिवसभरातील थकव्याशी याचा संबंध येतो. ५३ हजार व्यक्तींच्या तपासणीमध्ये ३३ टक्के पुरुष आणि १० टक्के महिलांना जास्त धोका असल्याचे आढळून आले.
फॅटी लिव्हर, रजोनिवृत्तीनंतर आरोग्याच्या निर्माण होणाऱ्या समस्या, स्थूलपणा या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. नवीन निदान पद्धती आणि लवकरात लवकर निदान करण्याची निकड या अहवालातून स्पष्ट होते. तसेच व्यक्तींच्या जीवनशैलीवर आधारित उपचारांची आणि त्यांची काळजी घेण्याची गरज अहवालमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. डॉ. सुनीता रेड्डी,व्यवस्थापकीय संचालक, अपोलो रुग्णालय
© The Indian Express (P) Ltd