मुंबई : पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे. महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयांत योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज येत आहेत. पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने ही ‘अर्ज माघार’ सुरू असल्याचे दिसून येत आहे. या महिलांना दंड आकारण्याचा कोणताही विचार नसला तरी, त्यांनी मिळवलेली रक्कम ‘थेट हस्तांतर योजने’शी संलग्न खात्यांमधून वसूल करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
महायुती सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. राज्यातून दोन कोटी ६३ लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. दोन कोटी ४७ लाख महिला पात्र ठरल्या. त्यातील दोन कोटी ३४ लाख बहिणींना विधानसभा निवडणुकीअगोदर पाच महिने दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले. या योजनेचा महायुतीला चांगला फायदा झाला. महायुती सत्तेत आल्यानंतर डिसेंबरचा हप्ताही देण्यात आला. मात्र, या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर प्रचंड भार पडणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील लाभार्थींची पडताळणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाला केल्या होत्या. त्यानुसार या विभागाकडून पडताळणी मोहीम राबवण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शेकडो महिलांनी योजनेतून माघार घेण्यासाठी लगबग चालवली आहे.
हेही वाचा >>> उलवे येथील बालाजी मंदिर भूखंड प्रकरण : हरित लवादाकडून तिरुपती संस्थानला १० हजारांचा दंड
या योजनेतील लाभार्थी असलेल्या पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिकाधारक वगळता अन्य लाभार्थींची पडताळणी करण्याची घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजना व संजय गांधी निराधार योजनेतून लाभ घेणाऱ्या ‘बहिणीं’ना वगळण्यासाठी त्यांची माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मागवण्यात आली आहे. यापैकी निराधार योजनेतील महिलांना आधीच दरमहा दीड हजार रुपये मिळत असल्याने त्यांना कोणताही लाभ दिला जाणार नाही तर, नमो शेतकरी सन्मान योजनेत एक हजार रुपये दिले जात असल्याने या महिलांना आणखी केवळ पाचशे रुपये देण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून गैरप्रकारे मिळवलेल्या लाभाची रक्कम वसूलण्यात येईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> तापमान ३५ अंशावर
तीन ते चार लाख अपात्र ठरणार
राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांनी मोहिमा राबवत महिलांचे अर्ज भरून घेतले. त्या वेळी पात्रता निकषात बसत नसलेल्या महिलांकडूनही अर्ज भरून घेण्यात आले. शासनानेही निवडणुकीच्या तोंडावर पडताळणी न करता सरसकट लाभ दिले. मात्र, आता पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला योजनेतून अपात्र ठरतील, असा अंदाज महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला. येत्या २५ जानेवारीपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर २६ जानेवारीला पुढील हप्ता दिला जाईल, अशी शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पडताळणी कशी?
●केवळ पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिकाधारक महिलांनाच योजनेचा लाभ.
●नमो शेतकरी सन्मान योजनेतील १९ लाख २० हजार ८५ महिलांना दरमहा केवळ पाचशे रुपये
●संजय गांधी निराधार महिला योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळणार.