कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेकडून पर्यावरण जनजागृतीचा गाजावाजा केला जात असताना, सीएसएमटीच्या पुनर्विकासाठी शेकडो झाडे तोडली जाणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्याबाबत झाडांना क्रमांक देण्यात आले होते. आता या झाडांवर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून नुकताच नोटीस लावल्या आहेत. त्यात २६६ झाडांपैकी ८६ झाडे कापण्यात येणार असून १८० झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मराठा आरक्षणासाठी सात दिवसात ३९ लाख कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट्य, ३० हजार कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही घरोघरी फिरणार

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे सर्वाधिक रहदारीच्या स्थानकापैकी एक स्थानक आहे. वाढत्या प्रवाशांची रहदारी सुरळीत होण्यासाठी, प्रवाशांना नवनवीन सुविधा देण्यासाठी सीएसएमटीवर पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. फलाट क्रमांक १८ च्या परिसरात पुनर्विकासाचे काम सुरू आहे. त्यासाठी तेथील झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. परिणामी, तेथील पक्ष्यांचे निवासस्थान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२३ रोजी झाडांना क्रमांक देऊन, ती तोडण्याचे नियोजन होते तर, आता या परिसरातील प्रत्येक झाडावर पालिकेची नोटीस लावण्यात आली आहे.

हेही वाचा >>> मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यास HC चा नकार; सदावर्तेंची मागणी फेटाळली, राज्य सरकारला दिले महत्त्वाचे आदेश

‘ए’ विभागातील सीएसएमटीच्या प्रस्तावित पुनर्विकासासाठी आणि अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकामावर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीच्या कामात अडथळा आणणारी २६६ झाडे आहेत. यापैकी ८६ झाडे कापण्यात येणार आहेत. तर, १८० झाडांचे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत, अशी नोटीस मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्यालयात लावण्यात आली आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्णयानुसार कोणत्याही प्रकारचे फलक, जाहिरात, नोटीस, सूचना फलक झाडांना इजा करणाऱ्या वस्तूने लावणे गुन्हा आहे. यात टाचण्या, खिळे किंवा इतर टोकदार वस्तूंचा सहभाग आहे. मात्र, सीएसएमटीमधील फलाट क्रमांक १८ वरील झाडांना लावण्यात आलेल्या नोटीस या टाचण्यांनी लावणे गैर आहे. – तुषार वारंग, अध्यक्ष, टीम परिवर्तन