मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जदारांची प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारुप यादीनुसार एक लाख १३ हजार ८११ अर्जदारांपैकी एक लाख १३ हजार २३५ अर्जदार पात्र ठरले आहेत. तर ५७६ अर्ज अपात्र ठरले आहेत. नेहमीप्रमाणेच म्हाडाच्या घरासाठी कलाकार आणि लोकप्रतिनिधींनीही मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी पवईतील मध्यम गटातील घरासाठी अर्ज सादर केला आहे. तर ‘बिग बॉस’ विजेता विशाल निकम, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम निखिल बने यानेही घरासाठी अर्ज केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अंगाडिया खंडणी प्रकरण : IPS अधिकरी सौरभ त्रिपाठींविरोधात पुरावे आहेत का? उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न

मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी एक लाख १३ हजार ८११ अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी करून शुक्रवारी पात्र अर्जदारांची प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार ५७६ अर्जदारांचे अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. आवश्यक ती कागदपत्रे जमा न केल्याने, चुकीची माहिती दिल्याने अर्ज अपात्र ठरले आहेत. उर्वरित सर्व अर्जदार पात्र ठरले आहेत.

आता अपात्र अर्जदारांना आपल्या सूचना-हरकती नोंदविण्यासाठी मंडळाने दोन दिवसांची मुदत दिली आहे. या विहित मुदतीत आलेल्या सूचना-हरकतींचा विचार करून ३ ऑक्टोबर रोजी पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ८ ऑक्टोबरच्या सोडतीत नेमके किती अर्जदार सहभागी होणार हे स्पष्ट होईल. दरम्यान, मुंबई मंडळाच्या प्रारुप यादीनुसार लोकप्रतिनिधी आणि कलाकारांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत.

हेही वाचा >>> मुंबईकरांच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे प्रतिपादन

राजू शेट्टी यांच्यासह अन्य पाच लोकप्रतिनिधी मुंबईतील घरांच्या सोडतीत सहभागी होणार आहेत. तर निखिल बने, विशाल निकम यांच्यासह सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या ‘गोष्ट एका पैठणी’ची चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू रोडे, अभिनेता विजय आंदळकर यांनीही म्हाडाच्या घरासाठी अर्ज केले आहेत.

मी सध्या कोल्हापूरात शेतातील घरात रहातो. मला नेहमी मुंबईत यावे लागते. मुंबईत घर नसल्याने बरीच गैरसोय होते. आमदार निवास वा इतर ठिकाणी रहावे लागते. मुंबईत आल्यानंतर राहण्याची योग्य सोय व्हावी यासाठी म्हाडाच्या पवईतील घरासाठी अर्ज भरला आहे. मंत्रालयास जाणे सोपे व्हावे यादृष्टीने पवईतील घराला प्राधान्य दिले आहे. राजू शेट्टी, माजी खासदार

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over one lakh applicants for mhada lottery ex mp raju shetty bigg boss winner vishal nikam name among applicant mumbai print news zws