सध्या देशात राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारावरुन मोठा गदारोळ सुरु आहे. काँग्रेस राफेल करारावरुन मोदी सरकारची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासहर्तेबद्दल विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. मोदी सरकारसाठी एकूणच प्रतिकुल परिस्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींची पाठराखण केली आहे.
राफेल फायटर विमानांच्या व्यवहाराशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वैयक्तिक संबंध नाहीय असे शरद पवार यांनी म्हटले आहे. राफेल विमान खरेदी व्यवहाराशी मोदींची व्यक्तिगत संबंध नाहीय पण संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी होण्यास काही हरकत नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेसकडून नरेंद्र मोदींची चोर अशी संभावना केली जात असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मोदींच्या मदतीला धावून गेले आहेत.
राफेल व्यवहारात नरेंद्र मोदींच्या हेतूबद्दल लोकांच्या मनात संशय नाहीय असं महत्वपूर्ण विधान त्यांनी केलयं. शरद पवारांच्या राजकीय भूमिकेबद्दल नेहमीच एक अनिश्चितता असते. भाजपाच्या विरोधात असणारे सर्वच पक्ष या मुद्यावरुन रान उठवत असताना शरद पवारही मोदींना कोंडीत पकडतील असे वाटले होते. पण त्यांनी एकप्रकारे मोदींना क्लीनचीट देऊन टाकलीय. या व्यवहाराशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वैयक्तिक संबंध नाहीय असे त्यांनी म्हटले आहे.
त्याचवेळी या विमानाची तांत्रिक माहिती जाहीर करण्याची मागणी योग्य नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत. राफेल विमानांच्या किंमती मात्र सरकारने जाहीर केल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले. बोफोर्स तोफांच्या खरेदीवरुन भाजपाने त्यावेळी प्रचंड राळ उठवली होती. काँग्रेसने त्यांची संयुक्त संसदीय चौकशी समितीची मागणी मान्य केली होती. त्यामुळे आता संयुक्त संसदीय समितीची मागणी मान्य केली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. एकूणच शरद पवारांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.