मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील व्यवसायिकाच्या ठिकाणावर केलेल्या कारवाईत सव्वा दोन कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली असून ती कोणाची आहे ? याबाबत प्राप्तिकर विभाग तपास करत आहे. याप्रकरणी १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. बहुतांश नोटा ५००  रुपयांच्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त (पायधुनी आणि गिरगाव) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोडे (एलटी मार्ग पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने गुरूवारी भुलेश्वर मार्केट, काळबादेवी येथे छापा टाकला. पोलीस निरीक्षक अमोल काले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास तुपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे आणि इतर पथक सदस्यांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या रोख रक्कम घेऊन जात असलेल्या १२ जणांना ताब्यात घेतले.

हेही वाचा >>> विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई

संशयितांना प्राथमिक चौकशीसाठी मुंबादेवी पोलीस चौकीत नेण्यात आले. तिथे त्पांची झडती केली असता त्यांच्याकडील बॅगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या भरारी पथकाला (एफएसटी) तातडीने सतर्क केले गेले. या पथकाचे नेतृत्व नोडल अधिकारी सुरेश कांबळे यांनी केले. ते त्वरित छायाचित्रकारांसह पोहोचले आणि संपूर्ण कारवाईची नोंद केली.

हेही वाचा >>> अवैध मद्य वाहतुकीबद्दल उपनगरात २२६ गुन्हे दाखल

त्यानंतर ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना अधिक तपासणीसाठी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्या बॅगांची तपासणी केली असता त्यांच्याकडे एकूण दोन कोटी ३० लाख ८६ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम सापडली. संपूर्ण  प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. रोख रक्कम काळजीपूर्वक तपासणी करून ताब्यात घेण्यात आली आहे. बॅलार्ड पियर येथील येथील प्राप्तिकर विभागाच्या शाखेला याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर, निरीक्षक श्रेयस निश्चल आणि सत्यजित सिंह मीणा यांच्यासह अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठले. अधिक तपासासाठी संशयितांना ताब्यात घेतले.  या रकमेचा स्रोत आणि हेतू शोधण्यासाठी पुढील चौकशी सुरू आहे. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पुढील तपास प्राप्तिकर विभाग करत असून रोख रकमेबाबत आवश्यक कागदपत्रे आणण्यास सांगण्यात आले आहे.