टपावरून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना ओव्हरहेड वायरचा झटका लागल्याची घटना पश्चिम रेल्वेच्या विलेपार्ले स्थानकात सोमवारी संध्याकाळी घडली. चर्चगेटकडे येणाऱ्या गाडीच्या टपावर चढलेल्या दोघा प्रवाशांना हा झटका लागला. या घटनेत त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याला कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रेल्वेच्या टपावरून प्रवास करणे प्राणघातक ठरू शकते, असे वारंवार बजावूनही प्रवासी जीवघेणा प्रकार करत असल्याचे अनेकदा आढळले आहे. सोमवारी संध्याकाळी ८.२०च्या सुमारास विलेपार्ले येथून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकलच्या टपावर चढलेल्या दिनेश पालांडे (२२) आणि गुंडाप्पा पालांडे (१८) या दोन तरुणांना ओव्हरहेड वायरचा झटका लागला. २५ हजार व्होल्ट एवढय़ा उच्च दाबाच्या झटक्यामुळे दिनेश ९० टक्के होरपळला. त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. मुंबई महापालिकेत कंत्राटदार असलेले दिनेश पालांडे व गुंडाप्पा पालांडे भायखळा येथील रहिवासी आहेत. या अपघातात गुंडाप्पा पालांडे किरकोळ भाजला असून त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader