शैलजा तिवले
फटका गँगच्या आघातामुळे झालेल्या इजेवर मात
फटका गँगच्या आघाताने जखमी झालेली कल्याणची द्रविता सिंग आता २० जानेवारीला मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. या अपघातात तिच्या पायाला इजा झाल्याने तिच्यावर गेल्या १० महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. प्रथमच ती धावण्याचा सराव सुरू करणार आहे.
द्रविता लोकलच्या दारात उभी असताना रुळालगतच्या खांबावर चढून बसलेल्या फटका गँगने तिच्या डोक्यावर जोरात आघात केला होता. त्यामुळे ती रेल्वेतून रुळावर पडली आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेखाली तिचा डावा हात आणि उजवा पाय सापडले होते. तिच्या पायाच्या त्वचेला मोठय़ा प्रमाणात इजा झाली होती. भाटिया रुग्णालयात वेळीच उपचार झाल्याने तिचा पाय वाचला.
तिच्या तळपायाची त्वचा गेल्याने मांडीची त्वचा लावण्यात आली. सुरुवातीला तिला विशिष्ट प्रकारच्या चपला घालून सराव करावा लागत होता. तिच्या पायावर सहा शस्त्रक्रिया केल्या गेल्या. गेल्या दहा महिन्यांमध्ये तिच्या पायामध्ये झालेल्या सुधारणेनंतर आता ती मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. २० जानेवारीला मुंबईमध्ये ही मॅरेथॉन होणार असून नोंदणी अर्जही तिने भरला आहे.
द्रविताच्या पायाची त्वचा नाजूक असल्याने बुटामध्ये सिलिकॉनचे मोल्ड म्हणजेच गादीसारखा स्पंज लावण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या पायाला आधार मिळतो. त्वचा व मांस अपघातात गेले असून त्या ठिकाणी मांडीची पातळ त्वचा लावली आहे. आपल्या पायाप्रमाणे त्वचा पुन्हा तिच्या पायाला येणार नाही. त्यामुळे पायाची सातत्याने काळजी घेऊन बुटामध्ये हा स्पंज वापरून चालणेच अधिक फायदेशीर असेल, असे तिच्यावर उपचार करणारे भाटिया रुग्णालयाचे प्लास्टिक सर्जन डॉ. शैलेश रानडे यांनी सांगितले. द्रविताच्या मनातील भीती दूर होऊन पुन्हा चालण्याची ऊर्मी निर्माण व्हावी यासाठी आम्ही तिच्यासमोर अनेक आव्हाने ठेवली. ज्या रेल्वेमधून पडून ती जखमी झाली होती त्या रेल्वेनेच तिने अपघातानंतर तीन महिन्यांनी पुन्हा प्रवास केला. आता तिच्यासमोर मॅरेथॉनचे आव्हान आहे. यामध्ये ती अपंग गटातून नव्हे तर खुल्या वर्गातून सहभागी होणार आहे. हे आव्हानही पूर्ण करेल, असा विश्वास डॉ. रानडे यांनी व्यक्त केला.
हा काळ खूप अवघड होता; परंतु गेल्या १० महिन्यांत अनेक बदल घडत गेले. कुटुंबीय आणि डॉक्टरांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले. सध्या मी दिवसभरात अर्धा ते एक तास चालते. गेल्या दीड महिन्यापासून जॉगिंग सुरू केले आहे. मात्र अजूनही धावण्यास सुरुवात केलेली नाही. माझ्याकडे साधारण १५ दिवस आहेत. या काळात धावण्याचा सराव करेन आणि मॅरेथॉनमध्ये सहभागी होईन.
– द्रविता सिंग