मुंबई : महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईत अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) परराष्ट्र मंत्रालयालय व गृहविभागाच्या मदतीने चंद्राकरला दुबईतून ताब्यात घेतले. सहा हजार कोटींच्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे.

सौरभ चंद्राकर हा महादेव ॲपचा मालक असून तो दुबईतून महादेव बुक बेटींग ॲप चालवत होता. छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी असलेला सौरभ चंद्राकर तेथे फळांचा रस विकण्याचे काम करायचा. करोना काळात टाळेबंदी असताना तो सट्टेबाजीशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात आला. त्याने सट्टाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो ऑनलाइन बेटिंग व्यवसायात उतरला. त्याने हैदराबाद येथे जाऊन ऑनलाइन सट्टेबाजीचे प्रशिक्षण घेतले आणि त्यातून बेटींग ॲपची निर्मिती झाली. त्यामुळे सध्या महादेव बुक ॲप प्रकरण देशात खूप गाजत आहे. यामध्ये काही राजकारणी, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंधित लोकांचा समावेश असल्याचा संशय आहे. या ॲपची उलाढाल पाच हजार कोटींच्या घरात असल्याचा संशय आहे. या ॲपच्या माध्यमातून अवैध सट्टेबाजी करणाऱ्या संकेतस्थळांना ग्राहक पुरवले जायचे.

हे ही वाचा…अमर्याद काळासाठी विद्यार्थ्याची हकालपट्टी म्हणजे त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीचा मृत्यूच

यासोबतच या ॲपच्या मदतीने यूजर आयडी तयार करून त्याद्वारे सट्टेबाजी करण्यात येत होती. या प्रकरण झारखंड राज्यापुरते मर्यादित होते. पण फेब्रुवारी २०२३ मध्ये चंद्राकरचे यूएईमध्ये लग्न झाले आणि या विवाह सोहळ्यासाठी महादेव प्रवर्तकांनी रोख सुमारे २०० कोटी रुपये खर्च केले. कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून यूएईला नेण्यासाठी खासगी विमान भाड्याने घेण्यात आले होते. लग्नात सादरीकरण करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार व गायकांना बोलावण्यात आले होते. लग्नकार्याचे नियोजन, नर्तक, सजावट करणारे यांनाही मुंबईतून बोलवण्यात आले होते. अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, भारती सिंह, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम, अभिनेता पुलकीत, भाग्यश्री, कीर्ती खबंदा, एली अवराम यांनी दुबईमधील लग्नात सादरीकरण केल्यामुळे सर्वच यंत्रणांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी ईडीच्या तपासात हे सर्व व्यवहार हवालामार्फत झाल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक पुराव्यानुसार, योगेश पोपट यांच्या मेसर्स आर-१ इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने ११२ कोटी रुपये हवालाद्वारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले गेले आणि ४२ कोटी रुपय हॉटेल नोंदणीसाठी खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.