लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : विविध ठिकाणी कामगार पुरविणाऱ्या कंपनीच्या मालकाच्या वडीलांचे अपहरण करून त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये मनसेच्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा समावेश आहेत. त्या सहा जणांनी कपंनीच्या पर्यवेक्षकालाही शिवीगाळ करून मारहाण केली होती. आरोपींमध्ये संघटनेचा चिटणीस सुजय ठोंबरेचा सहभाग आहे.

विजय मोरे यांची विविध ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामगार पुरविण्याची कंपनी आहे. फोर्ट येथे बँक ऑफ इंडिया नजीक मोरे यांच्या कंपनीचे कार्यालय आहे. त्या कार्यालयात काम करणाऱ्या १७ जणांनी किरकोळ कारणांवरून सोमवारी अचानक काम बंद केले. त्या १७ जणांमध्ये दोन कार्यकर्ते देखील होते.काम बंद झाल्यानंतर तात्काळ काही कार्यकर्ते मोरे यांच्या कार्यालयात घुसले. त्यांनी पर्यवेक्षक सुजित सरोज (३६) याला धमकावून मारहाण व शिवीगाळ केली. एवढेच करून ते थांबले नाहीत. खंडणीखोर कार्यकर्त्यांनी मोरे यांचे वडील पांडुरंग मोरे यांना जबदरस्ती गाडीत बसवले व मनसेच्या दादर येथील युनियनच्या कार्यालयात घेऊन जात असल्याचे सांगून निघून गेले. त्यानंतर त्यांनी विजय मोरे यांना संपर्क साधून वडीलांची सुटका करायची असेल तर दहा लाख रुपये देण्याची मागणी केली. याबाबत मोरे यांनी तत्काळ आझाद मैदान गाठून तक्रार केली. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

सहाजण अटकेत

पथकाने याप्रकरणी तांत्रिक तपास व गोपनीय माहिती मिळवली. पांडुरंग मोरे यांचे अपहरण करून त्यांच्या मुलाकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी संघटनेचा चिटणीस सुजय ठोंबरे (३०), सुनील राणे (५६), अरुण बोरले (५२), अरुण शिर्के (२९), रोहित जाधव (२४), मनोहर चव्हाण (३९) यांना अटक केली. सुजय ठोंबरे याच्याविरोधात साकीनाका व कुर्ला पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. पांडुरंग मोरे यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली महिंद्रा थार ही गाडी पोलिसांनी जप्त केली.