थोर विचारवंत, समाजशिक्षक आणि ग्रंथकार डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे समग्र साहित्य आता एकत्र स्वरुपात संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. डॉ. सहस्रबुद्धे यांची ग्रंथसंपदा गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध नव्हती. ही उणीव दूर करण्यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. सहस्रबुद्धे यांचे १९ ग्रंथ आणि असंग्रहीत लेख असे सुमारे तीन हजार पानांचे विचारधन संकेतस्थळावर वाचायला मिळते.
संकेतस्थळावर ‘डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांच्याविषयी’ असा पहिला विभाग असून यामध्ये डॉ. सहस्रबुद्धे व्यक्तिदर्शन आणि साहित्यविवेचन’असा उपविभाग आहे. यात खंड १ ‘व्यक्तिदर्शन’, खंड २ ‘साहित्यविवेचन’असे विभाग वाचायला मिळतात. यात डॉ. के. ना. वाटवे, प्रा. गं. म. साठे, प्रा. बाळ गाडगीळ, डॉ. म. अ. करंदीकर, दत्तप्रसन्न काटदरे, डॉ. सरोजिनी बाबर, प्रा. विद्याधर पुंडलीक, प्रा. डॉ. सरोजिनी वैद्य, व. दि. कुलकर्णी आणि अन्य अनेक मान्यवरांनी लेखन केलेले आहे.
‘माझे चिंतन’, ‘पराधीन सरस्वती’, ‘राजविद्या’, ‘वैयक्तिक आणि सामाजिक’, ‘सौदर्यरस’ हे त्यांनी लिहिलेले निबंधसंग्रह आहेत. तर त्यांचे ‘भारतीय लोकसत्ता’, महाराष्ट्र संस्कृती’, ‘विज्ञानप्रणित समाजरचना’, ‘लोकसत्तेला दंडसत्तेचे आवाहन’, ‘स्वभावलेखन’, ‘भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म’, ‘हिंदूसमाज- संघटना आणि विघटना’, ‘इहवादी शासन’, ‘केसरीची त्रिमूर्ती’, ‘साहित्यातील जीवनभाष्य’ हे प्रबंधही येथे वाचायला मिळतात.
डॉ. सहस्रबुद्धे यांनी ललित लेखनही केले होते. यात ‘लपलेले खडक’ हा कथासंग्रह, ‘वधू संशोधन’ आणि ‘सत्याचे वाली’ ही नाटके यांचा समावेश आहे. हे सर्व लेखन, त्यांनी संपादित केलेला ‘लोकहितवादींची शतपत्रे’ हा ग्रंथ आणि त्यांचे काही असंग्रहीत लेखही या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत.

‘पुगं’चे विचार आजही उपयुक्त

सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत माझे काका डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे विचार उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत. हे विचार समाजापर्यंत विशेषत: विद्यार्थी आणि तरुणांपर्यंत पोहोचावे, त्यांचे साहित्य जास्तीत जास्त लोकांनी वाचावे, या उद्देशाने गेल्या अडीच वर्षांपासून हे काम हाती घेतले होते. त्यांच्या सर्व ग्रंथातील पानांचे मी स्वत: टंकलेखन करून तो मजकूर येथे दिला आहे. अन्य मासिके, नियतकालिके यातील लेखांचा यात समावेश नाही. कोणाकडे असलेले हे लेख मला उपलब्ध करून दिले गेले तर ते ही या संकेतस्थळावर आपण देऊ.
 – सुहास सहस्रबुद्धे (डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे यांचे पुतणे)  
    
‘डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच’
शिक्षक, प्राध्यापक, मराठीतील पहिले ‘पीएचडी’, निबंधकार, वक्ते अशी ओळख असलेल्या डॉ. सहस्रबुद्धे यांनी आयुष्यभर केवळ विद्यार्थ्यांना नव्हे तर संपूर्ण समाजाला इतिहास, धर्मकारण, राजकारण, समाजकारण, अर्थसत्ता आदींबाबत विचारधन मुक्तहस्ताने वाटले. आजच्या तरुण पिढीला त्यांची, त्यांनी केलेल्या कामाची ओळख व्हावी आणि त्यांच्या वैचारिक धनाचा अनमोल ठेवा विद्यार्थी, तरुण आणि समाजाला उपलब्ध करून द्यावा, या मुख्य उद्देशाने डॉ. सहस्रबुद्धे यांचे पुतणे सुहास सहस्रबुद्धे यांनी ‘डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच’https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.