वैद्यकीय निष्काळजीपणाच्या १३ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविलेल्या डॉ. पी. बी. देसाई यांच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. एक डॉक्टर म्हणून त्यांचे वर्तन हे पक्षपाती, बेफिकीर आणि प्रतिष्ठेचा मुद्दा करणारे असल्याचा ठपकाही न्यायालयाने डॉ. देसाई यांच्यावर ठेवला आहे. डॉ. देसाई यांना पद्मभूषम सन्मानाने भारत सरकारने गौरविले आहे.
माजी आयएएस अधिकारी पी. सी. सिंघी यांच्या कर्करोगग्रस्त पत्नीच्या मृत्युला डॉ. देसाई यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा ठपका ठेवत आधी महानगरदंडाधिकारी व नंतर सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले होते. तसेच त्यांना न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत एक दिवसाची साधी शिक्षा सुनावली होती. ती त्यांनी त्याच दिवशी पूर्ण केली. मात्र दोषी ठरविण्याच्या निर्णयाविरोधात डॉ. देसाई यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करताना न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांनी डॉ. देसाई यांना नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये जमा करण्याचे निर्देशही दिले.