मुंबई : प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जवळपास पाव शतकाची कारकीर्द, सव्वाशे क्रिकेट सामने आणि ५८९ बळी ही कारकीर्द भारतच काय, पण कोणत्याही क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेशी ठरावी. पण पद्माकर शिवलकरांच्या बाबतीत नियतीने वेगळा, कठोर न्याय केला. शिवलकर यांची कारकीर्द फुलत असताना क्रिकेट संघामध्ये असामान्य प्रतिभेचा डावखुरा फिरकीपटू खेळला आणि शिवलकर त्या संधीपासून वंचितच राहिले. त्यांनी सोमवारी मुंबईत जगाचा निरोप घेतला आणि एका युगाचा अन्त झाल्याचीच भावना सार्वत्रिक होती.

खरे तर हुकलेल्या संधीचे वैषम्य कोणासही नियती, व्यवस्थेप्रति कडवट बनवण्यास पुरेसे ठरते. पद्माकर शिवलकर तसे अजिबातच नव्हते. क्रिकेट आणि फिरकी गोलंदाजीवरील उत्कट प्रेम कधी कमी झाले नाहीच, शिवाय हिंदी चित्रपट संगीत आकंठ आस्वादण्याची रसिकताही कधी आटली नाही. परंतु ते स्वत: कितीही आनंदी राहिले, तरी त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनातही आजही शिवलकरांवर अन्यायच झाला ही भावना जागृत आहे. १९६२मध्ये सीसीआयकडून एका प्रदर्शनीय सामन्यात खेळताना त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फलंदाजांसमोर आव्हान उभे केले.

तो काळ फिरकी गोलंदाजीच्या सुवर्णयुगाचा होता, त्यामुळे दर एका भारतीय फिरकीपटूमागे पाच संधी न मिळालेले प्रतिभावानही असायचे. त्या काळी मुंबई संघात आणि भारतीय संघात होते साक्षात बापू नाडकर्णी. ते १९६८पर्यंत खेळत होते. त्यांच्यानंतर भारतीय संघातून खेळू लागले बिशनसिंग बेदी! बेदी, प्रसन्ना, चंद्रा, वेंकट ही फिरकी चौकडी चमकत असताना (वास्तविक चौघे क्वचितच एकत्र खेळले) शिवलकरांसाठी संधी दुरावतच गेली. पण ते प्राक्तन त्यांनी खूप आधीच स्वीकारले. त्यामुळे खेळपट्टीला वाहिलेल्या या फिरकी अवलियाने जवळपास पन्नाशीपर्यंत क्रिकेटची सेवा करण्यात धन्यता मानली. शिवलकरांच्या दृष्टीने तीच आयुष्याची इतिश्री होती.

Story img Loader