ठाणे : मुंबई येथील मंडळांनी मुंबई ते शिर्डी अशी काढलेल्या पदयात्रा आणि पालख्या आज, शुक्रवारी सकाळी ठाणेकरांच्या कोंडीचे कारण ठरले. कापूरबावडी चौक ते मानपाडा, भिवंडी येथील कशेळी ते कापूरबावडी चौक, साकेत रोड या भागात अभूतपूर्व वाहतुक कोंडी झाली. या वाहतुक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या ठाणेकरांचे मात्र हाल झाले. वाहन चालकांना अवघे १० ते १५ मिनीटांचे अंतर पार करण्यास सुमारे पाऊण तास लागत होता.

ठाणे शहरात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची सुरू असलेली कामे, रस्ते खोदकामे यामुळे शहरातील महत्त्वाचे रस्ते अरुंद झाले आहे. अरुंद रस्त्यामुळे दररोज ठाणेकरांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतुक कोंडीमुळे ठाणेकर बेजार झाले आहेत. आजची कोंडी ही मेट्रोची कामे अरुंद रस्त्यांमुळे नव्हती. आजच्या कोंडीचे कारण ठाणेकरांसाठी वेगळे होते. मुंबई शहरातून काही मंडळांनी मुंबई ते शिर्डी अशा पदयात्रा काढल्या आहेत. या पदयात्रांमध्ये मोठ्याप्रमाणात मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. तसेच पदयात्रेत रथ, लहान मोठे ट्रक, टेम्पो यांचाही सामावेश आहे. हे मंडळ ठाणे, भिवंडी मार्गे शिर्डीत जातात. परंतु त्याचा परिणाम शुक्रवारी सकाळी ठाणेकरांना सहन करावा लागला.

कापूरबावडी चौकात मेट्रोच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच, या मंडळांच्या पदयात्रा शहरात दाखल झाल्याने कापूरबावडी चौक ते मानपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. शाळेच्या बसगाड्या देखील या कोंडीत अडकल्या. काही वाहन चालकांनी कोलशेत, ढोकाळी मार्गे पर्यायी वाहतुक सुरु केली. त्यामुळे या मार्गिकेवर देखील कोंडी झाली होती. तसेच कापूरबावडी, कशेळी मार्गावरही वाहन चालकांना कोंडी सामना करावा लागला. त्याचा परिणाम साकेत मार्गावरही जाणवला. साकेत-ठाणे मार्गावर वाहतुक कोंडी झाली होती.

तापमान वाढत असल्याने कडाक्याच्या उन्हाचा मारा वाहतुक कोंडीत अडकलेल्या चालकांना सहन करावा लागला. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. वाहतुक कोंडीतून मार्ग काढताना वाहन चालकांच्या नाकी नऊ आले होते. तसेच कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांकडून वाहनांचे कर्णकर्कश हाॅर्न वाजविले जात होते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागला. वाहन चालकांना अवघ्या १० ते १५ मिनिटांसाठी सुमारे पाऊण तास लागत होता. सकाळी १०.३० नंतरही ही वाहतुक कोंडी सुटली नव्हती.