मुंबई : पहलगाममधील बैसरन येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता काश्मीरमध्ये असलेल्या आणि तिथे जाण्यासाठी टूर बुक केलेल्या पर्यटकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. मात्र, या हल्ल्याेनंतर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात असून तेथील पर्यटन सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे काश्मीरच्या नियोजित टूर रद्द होणार नाहीत, केंद्र सरकारकडून अधिकृत सूचना मिळेपर्यंत काश्मीरमधील नियोजित दौरे थांबवण्यात येणार नाहीत, असा निर्णय नामांकित पर्यटन कंपन्यांसह अन्य पर्यटन व्यावसायिकांनी घेतला आहे. सध्या तिथे असलेल्या पर्यटकांची टूर सुरक्षितपणे होईल, याबाबत आम्ही दक्ष आहोत, असेही पर्यटन व्यावसायिकांनी स्पष्ट केले आहे.

‘पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. या हल्ल्यानंतर सरकारने काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेत दुप्पटीने वाढ केली आहे. सध्या लाल चौकासह अनेक महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर पोलिसांबरोबरच सैन्य दलाचे अधिकारी तैनात आहेत. प्रत्येक हॉटेलबाहेर सैनिक तैनात आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. आता तिथे असलेले पर्यटक शिकारा सफरीपासून अनेक गोष्टींचा आनंद घेत आहेत.

हल्ल्यामुळे पर्यटकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होणे साहजिक आहे, मात्र त्यांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या मनातील भीती कमी करून नियोजित टूर्सचा आनंद त्यांना कसा घेता येईल यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत’, असे ‘केसरी टूर्स’चे शैलेश पाटील यांनी सांगितले.

मुंबई-पुण्यातून विचारणा…

मुंबई-पुण्यातून काश्मीरसाठी टूर बुक केलेल्या अनेकांनी आम्ही काश्मीरला जायचे की नाही? अशी विचारणा केली आहे, मात्र कोणीही टूरचे बुकिंग रद्द केलेले नाही, असेही शैलेश पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारकडून जोपर्यंत टूर्स थांबवण्याचे आदेश येत नाहीत, तोवर काश्मीर टूर ठरल्याप्रमाणे होतील, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवले

आमचे ३६ पर्यटक सध्या गुलमर्ग येथे पर्यटनाचा आनंद घेत आहेत. पहलगाममध्ये बैसरन येथे हल्ला झाला त्याआधीच आमच्या पर्यटकांचा चमू पहलगाममधील प्रेक्षणीय स्थळे पाहून पुढे आला होता. त्यांना काही अंतरावरून गोळीबाराचा आवाज आला, मात्र काय घडले असावे याची निश्चित कल्पना आली नाही. आमच्या अनुभवी टूर व्यवस्थापकांना दुर्घटना घडली असावी असा अंदाज आला होता, त्यांनी लगोलग पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवले, अशी माहिती पुण्याती विहार टूर्सचे संचालक दीपक पुजारी यांनी दिली.

स्थानिकांची मदत

हा हल्ला अत्यंत दुर्दैवी होता, मात्र त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात सैन्यदलाने कोणतीही कसर ठेवलेली नाही. सोनमर्ग, गुलमर्ग अशी महत्त्वाची पर्यटनस्थळे खुली आहेत. आता या क्षणी काश्मीरमध्ये छोट्या-मोठ्या कंपन्यांचे मिळून हजारो पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहेत. त्यांच्या मनात काही प्रमाणात धाकधूक आहे, मात्र त्यांना आश्वस्त करत पर्यटन ठरल्याप्रमाणे सुरक्षिततेत आणि आनंदात व्हावे यासाठी स्थानिक लोकांच्या मदतीने आमचे टूर व्यवस्थापक प्रयत्नशील आहेत, असेही दीपक पुजारी यांनी सांगितले.

सरकारी आदेश येईपर्यंत टूर थांबवणार नाही

सरकाकडून जोपर्यंत काश्मीरमधील पर्यटन थांबवण्याचा आदेश येत नाही, तोवर नियोजनाप्रमाणे पुढील काश्मीर टूर सुरूच ठेवण्याचा निर्णय पर्यटन व्यावसायिकांनी घेतला असल्याचे ‘ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे’चे अध्यक्ष निलेश भन्साळी यांनी सांगितले. पहलगाममधील दुर्दैवी घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

सरकार, सैन्यदल सगळेच अलर्ट आहेत, त्यामुळे एक-दोन दिवसांत सगळे वातावरण निवळेल. जे पर्यटक जखमी झाले आहेत, त्यांना परत आणण्याची जबाबदारीही सरकारने घेतली आहे. शिवाय, हवाई कंपन्यांनीही पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे थोडीशी अस्वस्थता असली तरी पर्यटकांनी निश्चिंत मनाने काश्मीरमधील त्यांच्या टूर कराव्यात, असे आवाहनही भन्साळी यांनी केले.

धोका पत्करायचा नाही…

काश्मीरमधील घटनेनंतर आम्हाला आमच्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही. आमचा एक चमू कालच काश्मीरमधून परतला आहे. यापुढच्या टूर सध्या तरी आम्ही थोड्या पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती ‘मँगो हॉलिडेज’चे मिलिंद बाबर यांनी दिली.